सिलेंडर चोरणार अटकेत

नवी मुंबई : घरगुती आणि व्यावसायिक वापराचे सिलेंडर चोरणार्‍याला नेरुळ पोलीसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतून चोरलेल्या सिलेंडरची तो पनवेल परिसरात विक्री करत होता. त्याच्याकडून सिलेंडर चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली असून एक टेम्पो व 115 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

जुईनगर रेल्वे स्थानक आवारातील उभ्या टेम्पो मधून गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची घटना 5 जुलैला घडली होती. त्याच परिसरात यापूर्वी देखील टेम्पोसह गॅस सिलेंडर चोरीला गेले होते. त्यामुळे गुन्हा दाखल होताच नेरुळ पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही अथवा तांत्रिक तपासावर भर दिला होता. यासाठी उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नेमले होते. त्यांनी केलेल्या कसून तपासात एका संशयीत टेम्पोची माहिती मिळाली होती. त्याद्वारे बुधवारी पनवेलच्या तक्का परिसरातून श्रीराम गोपीलाल बिष्णोई (23) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने केलेल्या चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात नेरुळ परिसरातील 3 व एपीएमसी परिसरातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्याने यापूर्वी चोरलेला एक टेम्पो व 115 गॅस सिलेंडर असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीराम याने यापूर्वी गॅस एजन्सी मध्ये काम केले आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळी सिलेंडरने भरलेले टेम्पो कुठे उभे असतात याची त्याला माहिती होती. तर चोरलेले सिलेंडर तो पनवेलच्या ग्रामीण भागात 3 हजार रुपयांना विकत होता. ज्या ग्राहकांना जोड सिलेंडरची गरज असेल त्यांना तो या सिलेंडरची विक्री करायचा.