Breaking News
नवी मुंबई : मेजर संदीप उन्नीकृष्णन - अशोकचक्र यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल, मुंबई यांच्या वतीने गर्भाशय कर्करोग जनजागृतीसाठी ‘सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वा. मुंबईतून गेट वे ऑफ इंडियापासून सुरू झालेल्या या सायक्लोथॉनव्दारे राष्ट्रभक्तीचा व आरोग्याविषयी जागरूकतेचा संदेश प्रसारित करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यामध्ये स्वत: सहभागी होत राष्ट्रभक्तीचा व आरोग्य जनजागृतीचा संदेश प्रसारित केला.
मुंबईपासून नवी मुंबईमार्गे पवईपर्यंत जाणाऱ्या या सायक्लोथॉनचा सेक्टर 26, नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटकांचे आवडते ठिकाण असणाऱ्या स्थळावर विशेष थांबा घेण्यात आला. यावेळी किंग हॉस्पिटल मुंबईच्या डॉक्टरांनी गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी पथनाट्य सादर करीत त्याविषयी सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत मुंबईतून गेट वे ऑफ इंडियापासून सुरूवात करून नवी मुंबईतील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे 40 किमीचे अंतर 1 तास 31 मिनीटात पार केले.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करताना त्यासोबतच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा आरोग्यहिताय उपक्रम राबविणे ही फार मोठी लोकहिताची गोष्ट असून त्याबद्दल कर्नल अभिषेक सिंह आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलातील सहकाऱ्यांची प्रशंसा केली. सध्या बदलत्या जीवनशैलीत कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसत असून त्यातून बचावासाठी लवकर निदान होणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीने महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने सगळ्या रूग्णालयांमध्ये व काही नागरी आरोग्य केंद्रांमध्ये 14 ठिकाणी आठवड्यातून 2 दिवस मंगळवार व शुक्रवारी मास स्क्रीनींग सुरू केले आहे. आत्तापर्यंत 70 हजारहून अधिक मास स्क्रीनींग झाले असून त्या तपासणीमध्ये संशयित आढळलेल्या 7 महिलांना पुढील तपासणीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलला संदर्भित केले आहे. त्यामध्ये निदान झाल्यास त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील. केमोथेरपीसाठी महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयात 10 बेड्सचा केमोथेरपी वॉर्ड सुरू करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी कर्नल अभिषेक सिंग यांनी शहीद जवानांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी मेजर संदीप उन्नीकृष्णन अशोकचक्र हा सायक्लोथॉन उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai