Breaking News
नवी मुंबई ः युनोस्कोने नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांचे बारा दुर्ग समाविष्ट केले आहेत. हा सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा विषय असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार ‘दुर्गोत्सव’ हा अभिनव उपक्रम साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
दिपावली आणि फराळ, रांगोळी याप्रमाणेच या उत्सवात मिळेल त्या जागेत लहानथोरांनी मिळून दुर्गांच्या प्रतिकृती बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा आहे. या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळतोच, तसेच पुढच्या पिढीच्या मनात आपल्या वैभवशाली वारशाच्या अभिमानाची रूजवात होते. हा शिवछत्रपतींना मानवंदना देणारा दीपावली कालावधीत स्वयंस्फुर्तीने साजरा होणारा दुर्गोत्सवाचा उपक्रम अत्यंत वैशिष्टयपूर्ण असून जगात कुठेही अशा स्वरूपाचा उपक्रम साजरा केला जात नाही. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी आपल्या अंगणात, घरासमोरील जागेत, सोसायटीच्या आवारात, बागेमध्ये अथवा बाल्कनीत युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग अशा 12 दुर्गांच्या हुबेहुब प्रतिकृती उत्तम सजावटीसह आपल्या कुटुंबातील परिवारातील सर्वांनी एकत्र येऊन बनवाव्यात.
या दुर्गोत्सवात सहभागी होण्याकरिता दि. 12 ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत https://www.durgotsav.com/ या डिजीटल प्लॅटफॉर्मवर नाव व इतर तपशीलाचा फॉर्म भरून नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने आपण बनविलेल्या 12 पैकी एका दुर्गासोबतचे सेल्फी छायाचित्र काढून ते त्याच डिजीटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करावयाचे आहे. या छायाचित्राची अमृत संस्थेमार्फत वैधता पडताळणी सिध्द झाल्यानंतर भाग घेणाऱ्या प्रत्येकास शासनाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे ‘अभिनंदन पत्र’ डिजीटल स्वरूपात प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘शिवचरित्रातून आज घ्यावयाचे धडे’ या विषयावरील उत्कृष्ट असे ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपातील गोष्टीचे संकलनही नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.
कोणत्याही उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला अभिमान अभिव्यक्त करण्यासाठी तसेच दीपावली सणात दुर्गांच्या प्रतिकृती बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी दुर्गोत्सव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai