Breaking News
15 जुलैपर्यंत काढू शकता विमा
नवी मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी, उडिद या पिकांकरीता पीक विमा काढण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै, 2024 आहे, अशी माहिती कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे.
योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगाम 2024 करीता पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी, उडिद या पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही माने यांनी कळविले आहे.
ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामी अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तींचा अधिन राहून निश्चित केली जाईल. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai