गोल्फ कोर्सची जागा पाणथळ नाही

जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षण यादीत नाव नाही

नवी मुंबई : सिडकोच्या सीवूड येथील नियोजित गोल्फ कोर्सच्या जागेवर पाणथळ क्षेत्र नसल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पाणथळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात गोल्फ कोर्स उभारण्यात येत असलेल्या जागेचा उल्लेख नसल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

पामबीच मार्गालगत सीवूड येथे सुमारे 35 हेक्टर जागेवर गोल्फ कोर्स उभारण्यात येत आहे. त्यासाठी मातीचा भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील जवळपास 33 हेक्टर क्षेत्रावर पाणथळा असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने फ्लेमिंगो येतात. प्रकल्पामुळे फ्लेमिंगोचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पाणथळ क्षेत्रातील खारफुटी तोडल्याने पर्यावरणाचाही र्‍हास होत असल्याची तक्रार आहे. प्रकल्पासाठी या क्षेत्रातील जवळपास 700 वृक्षांची कत्तल करण्यात आली, त्यामुळे संतप्त पर्यावरणप्रेमी व स्थानिक रहिवाशांनी गेल्या महिन्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे या प्रकरणी दाद मागितली. त्यानुसार 28 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत पर्यावरणाला बाधा निर्माण करणारा गोल्फ कोर्सचा प्रकल्प बंद करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले होते. तसेच या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य करता येईल, याबाबत चाचपणी करण्याचे निर्देशसुद्धा सिडकोला दिले होते. मात्र, पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सिडकोने गोल्फ कोर्स प्रकल्पाचे काम सुरूच ठेवल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

सर्वेक्षणाबाबत संभ्रम

जिल्हा प्रशासनाच्या तहसील कार्यालयाने अलीकडेच शहरातील पाणथळा क्षेत्राचे सर्वेक्षण केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी शहरात 19 पाणथळ्यांची नोंद होती. नव्या यादीत यातील फक्त तीन पाणथळा क्षेत्र अधोरेखित करण्यात आली आहेत. तर एका ठिकाणी पाणथळा नव्हताच, असे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित 15 क्षेत्रांत पाणथळा नसल्याचे या सुधारित यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला असून पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.