आकृतीबंधासाठी राज्यपालांना साकडे

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आकृतीबंधाची प्रक्रिया गेल्या दोन वर्षापासून रखडली आहे. परिणामी पदनिर्मिती व भरती प्रक्रिया होत नसल्याने कामकाजाचा ताण उपलब्ध कर्मचार्‍यांवर पडत आहे. त्यामुळे आकृतिबंधाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत, संबंधित विषयात लक्ष घालण्याची मागणी केली.

मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या आकृतिबंधाला शासकीय मंजुरीची गरज आहे. ही प्रक्रिया रखडली असल्याने पालिकेला अतिशय कमी मनुष्यबळावर आपला गाडा हाकावा लागत आहे. अशा परिस्थितीत इतर कर्मचारी व अधिकारी वर्गावर याचा ताण पडत आहे. पनवेल पालिकेचा 2,000 पेक्षा जास्त पदांचा आकृतिबंध आहे. संबंधित आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यास पालिकेला पुरेसे मनुष्यबळ प्राप्त होईल, तसेच मनुष्यबळाच्या अभावी रखडलेली कामे मार्गी लागतील, याकरिताच लवकरात लवकर या आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची गरज असल्याने, गायकवाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांना विनंती केली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी या संदर्भात शासकीय पातळीवर संबंधित नगरसचिवाना सूचना देण्याचे आश्‍वासन जगदीश गायकवाड यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जगदीश गायकवाड यांच्यासोबत नगरसेविका विद्या गायकवाड, राजाराम पाटील, सुहास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.