Breaking News
कर्नाळा बँक घोटाळाप्रकरण ; 100 एकर जमीनीचा लिलाव
पनवेल ः कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणात 2021 पासून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील तुरुंगात आहेत. या प्रकरणात 529 कोटी रुपयांचा गैरव्यवहार माजी आ. विवेक पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या बँकेतील काही गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम मिळाली असली तरी शेकडो गुंतवणूकदार आजही हक्काची रक्कम परत कधी मिळेल या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे विवेक पाटील यांच्या पोसरी गावातील सूमारे 100 एकर जमीन महसूल विभागाने शुक्रवारी जाहीर नोटीसीने लिलावात काढली आहे. हा विवेक पाटील यांना मोठा दणका मानला जात आहे.
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने जून 2021 मध्ये माजी आ. विवेक पाटील यांना अटक केली. बोगस कर्ज प्रकरण वाटणे आणि ती कर्ज रक्कम पुन्हा बँकेच्या तिजोरीत जमा न केल्याचे चौकशीत समोर आल्याने माजी आ. विवेक पाटील तुरूंगात आहेत. सक्तवसुली संचालयन या संस्थेसोबत राज्याच्या सीआयडीने सुद्धा या प्रकरणात वेगळा गुन्हा नोंदविल्यामुळे माजी आ. पाटील यांच्या अडचणी वाढल्या. या दोन्ही तपास यंत्रणांनी न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडल्यामुळे विवेक पाटील यांना गेली चार वर्षे जामीनही मिळू शकला नाही. त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी तपास यंत्रणेसमोर आणि न्यायालयासमोर स्वमालकीची तसेच बँकेच्या मालकीच्या 87 विविध मालमत्तांची यादी तपास यंत्रणाना दिली होती. याच मालमत्तांच्या विक्रीतून बँकेतील गुंतवणूकदार व इतरांची देणी भागविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता.
सरकारने कायदेशीर पद्धतीने बँक गैरव्यवहारातील रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारी पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी याबाबत वर्तमानपत्रातून पोसरी गावातील सर्वे क्रमांक 51/ 1/ अ यावरील 41 हेक्टर 6 गुंठे जमीन क्षेत्राचा लिलाव 51 कोटी 33 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा जाहीर केला. सूमारे 107 एकर जमीनीवर पाटील यांनी कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शंकरशेठ शिवराम पाटील कृषी पणन व व्यवस्थापन महाविद्यालय उभे कऱण्यासाठी खरेदी केल्याचे लेखाशिर्षकात दाखवले होते. पोसरी येथील जमीनीच्या लिलावासोबत मुंबई व परिसरातील मोठे गुंतवणूकदारांचे लक्ष्य कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या लिलावाकडे लागले आहे. अजूनपर्यंत तरी कायदेशीर प्रक्रियेत हा लिलाव अडकला आहे. शासनाच्या व तपास यंत्रणांच्या या ताठर भुमिकेमुळे या लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ठेवीदारांना त्यांची रक्कम न्यायालयाच्या मंजुरीनंतर देण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai