Breaking News
पनवेल : पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या पाच वर्षात उपचार दिलेल्या रुग्णांची संख्या 16 लाखांवर पोहचण्याच्या वाटेवर असताना ज्या ठिकाणी महापालिकेच्या स्वमालकीच्या जागा नाहीत अशा ठिकाणी सुद्धा आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात कोपरा, तळोजा, नवीन पनवेल, देवीचा पाडा, तक्का या पाच नवीन ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाल्यावर नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळू शकतील.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने पोर्टेबल कंटेनर केबीनमध्ये आरोग्यवर्धिनी सुरू करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या होत्या, त्यानूसार महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानूसार महापालिकेने पाच ठिकाणी पोर्टेबल कंटेनर केबीनमध्ये आरोग्य दवाखाने सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. तसेच हे केंद्र सुरू करण्यासाठी कंटेनर केबीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून ही निविदा प्रक्रिया पार पडण्यानंतर लवकरच पनवेल महापालिका क्षेत्रात कोपरा, तळोजा, नवीन पनवेल, देवीचा पाडा, तक्का या पाच नवीन ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.
पनवेल महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नाही. मात्र महापालिका क्षेत्रातील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांना तोंड देताना स्वतःच्या खिशाची पदरमोड करण्यापेक्षा महापालिकेच्या दवाखान्यातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रांचे जाळे शहरभर पसरविण्यात आले. महापालिका क्षेत्रात 26 ठिकाणी दवाखान्यातून नागरिकांना उपचार दिले जातात. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या 15 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, 9 आरोग्यवर्धिनी केंद्र आणि दोन आपला दवाखाना तसेच दोन फीरते मोबाईल वैद्यकीय युनिट आहेत. नागरिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह 15 हून अधिक आरोग्यसेवक आहेत. तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रात आणि आपला दवाखान्यात एका डॉक्टरांसह प्रत्येकी पाच आरोग्य सेवक आहेत. महापालिका क्षेत्रात खारघर व नावडे येथे आपला दवाखाना सुरू आहे. महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र ही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवली जात असल्याने नोकरदारवर्गाला या केंद्रातून उपचार घेणे सोयीचे होते. गेल्या पाच वर्षात आतापर्यंत 15 लाख 98 हजार 284 रुग्णांनी विविध आजारामध्ये महापालिकेच्या दवाखान्यांना भेट देऊन उपचार घेतले. तसेच पोर्टेबल कंटेनरमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सूरु करण्यासाठी शासनातर्फे 21 लाख रुपयांचा निधी पनवेल महापालिकेला मिळणार आहेत. यातून ही सेवा जेथे महापालिकेची स्वतःची जागा नाही अशा ठिकाणी होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai