कळंबोलीत उभारणार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 02, 2020
- 593
सिडकोचा निर्णय; पुनर्प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीला पुरविणार
नवी मुंबई ः कळंबोली येथे सिडकोच्यावतीने मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्र प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या नियोजित मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्रातून 30 दशलक्ष लीटर पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविण्याचे नियोजन सिडकोने केले आहे. यामुळे तितक्याच प्रमाणात पिण्यायोग्य अशा स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे.
सिडकोचे कळंबोली येथे 50 द.ल. लीटर क्षमतेचे मलनि:सारण केंद्र कार्यान्वित असून या केंद्रातून दररोज किमान 20 ते 25 द.ल. लीटर सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच कामोठे येथील मलनि:सारण केंद्रामध्ये दररोज कमीत कमी 20 ते 25 द.ल. लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. कळंबोली आणि कामोठे येथील मलनि:सारण केंद्रांमधून अंदाजे 45 द.ल. लीटर सांडपाणी हे कळंबोली येथील नियोजित मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्र (टी.टी.पी.) येथे गोळा केले जाणार आहे. त्यानंतर पुनर्प्रक्रिया केंद्रामध्ये 41 द.ल. लीटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाऊन त्याद्वारे मिळणारे 30 द.ल. लीटर पाणी पुनर्वापरासाठी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविले जाणार आहे. सदर मलनि:सारण पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी होणारा अंदाजित खर्च काढण्यासाठी सिडकोतर्फे तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला असून या सल्लागाराने व्यवहार्यता अहवाल सादर केला आहे. यामध्ये कळंबोली मलनि:सारण केंद्राचे अपग्रेडेशन, नवीन मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी येणार खर्च, मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्रापासून तळोजा औद्योगिक क्षेत्रापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचा खर्च, पुढील 20 वर्षे देखभाल व दुरुस्तीचा खर्च, पनवेल महानगरपालिकेला द्यावे लागणारे शुल्क व इतर प्रशासकीय खर्च यांबद्दलच्या व्यवहार्यतेची तपासणी केली आहे. सदर मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्र सन 2021 या वर्षात विकसित करण्याचे नियोजित आहे.
सर्वत्र जगभर पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात असताना अशाप्रकारे सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोतर्फे करण्यात येणारे प्रयत्न हे पाणी बचत व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai