आयुक्तांनी केली स्वच्छता कामांची पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 31, 2020
- 617
नवी मुंबई ः पूर्वसूचना न देता महानगरपालिकेच्या सेवा सुविधांची पाहणी करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यपध्दतीनुसार गुरुवारी त्यांनी बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे विभागातील स्वच्छता विषयक कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
बेलापूर विभागातील अग्निशमन केंद्रापासून सेक्टर 1, 2, सेक्टर 8, 8 ए, सेक्टर 15, आग्रोळीगांव, पारसिक हिल, राहुलनगर तसेच नेरुळ विभागातील सेक्टर 19, 19 ए, 21, कुकशेत गांव, सेक्टर 2, जुईनगर, चिंचोली तलाव, सेक्टर 2 सानपाडा, सानपाडा रेल्वे स्टेशन, वाशी सेक्टर 15, 16, सेक्टर 9 बाजार, मिनी सी शोअर त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागातील निसर्गोद्यान व तेथील स्वच्छता पार्क आणि त्याशेजारील टाकाऊ साहित्याचे डंपींग यार्ड अशा विविध स्थळांना भेटी देऊन आयुक्तांनी स्वच्छता, सुशोभिकरण व अनुषांगीक बाबींची पाहणी केली. वेगवेगळ्या विभागांमधील काही सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या आतील व बाहेरील स्वच्छतेची पाहणी करताना व तेथील केअर टेकरशी संवाद साधताना आयुक्तांना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने अनेक बाबींची माहिती तेथील केअर टेकर यांना नसल्याचे जाणवले. त्यास अनुसरून आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील सर्व शौचालयांची देखभाल दुरुस्ती करणार्या सेवाभावी संस्थांमार्फत ठेवण्यात आलेल्या केअर टेकर यांची माहितीप्रद कार्यशाळा तत्परतेने घ्यावी व शौचालयाची योग्य निगा राखणेबाबत त्यांना माहिती द्यावी व प्रबोधन करावे असे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांना दिले.
आपण पुरवित असलेल्या स्वच्छता गृहांच्या सुविधांमध्ये ओडीएफ डबल प्लसचे निकष पाहता कोणतीही कमतरता रहायला नको, त्या परिपूर्णच हव्यात असेही निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले. चिंचोली तलावातील गाळ काढून त्याची सफाई करण्याच्या कामाची पाहणी करताना पंपाव्दारे तलावातील बाहेर काढल्या जाणार्या पाण्याला व्यवस्थितरित्या निचरा होईल याकडे लक्ष द्यावे व हे काम करताना तलावाशेजारील उद्यानाच्या सुशोभिकरणाला बाधा पोहचणार नाही याची काळजी घ्यावी असे त्यांनी निर्देशित केले. सुशोभिकरण कामांमध्ये लिहिले जाणारे संदेश, शौचालयांवर वा इतर ठिकाणी लिहिण्यात येणार्या सूचना, संदेश यामधील शुध्दलेखनाकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. वाशी सेक्टर 9 येथील मार्केट परिसराची पाहणी करताना तेथील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे व दुकानदारांप्रमाणेच फेरीवाल्यांनाही कचर्याचा डबा ठेवणे बंधनकारक करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. सानपाडा रेल्वे स्टेशनला भेट देताना तेथील अंतर्गत व बाह्य भागातील स्वच्छतेची करताना सिडको, रेल्वे व संबंधित प्राधिकरणांचे सर्वेक्षण कार्यात योगदान असले पाहिजे याकरिता त्यांची याच आठवड्यात समन्वय बैठक आयोजित करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. स्वच्छतेमधील प्लास्टिक प्रतिबंध हा एक महत्वाचा घटक असून सर्व विभागांमध्ये सिंगल युज प्लास्टिक विरोधी धडक मोहिमा राबवाव्यात व त्याचा अहवाल दररोज संध्याकाळी सादर करावा असे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले. निसर्गोद्यानाशेजारील टाकाऊ साहित्याच्या डंपींग यार्डची पाहणी करताना तेथील टाकाऊ साहित्य / भंगार गाड्या यांची विहित पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
स्वच्छ व सुंदर शहर ही नवी मुंबईची ओळख आहे. देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वोत्कृष्टच काम केले पाहिजे हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने काम करावे ही महापालिका आयु्क्त अभिजीत बांगर यांची भूमिका असून त्यादृष्टीने प्रत्येक कामाची आयुक्त पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai