कृष्णा मला सांग

मीरा के बोल

कृष्णा मला सांग
का वाटे सतत एकटे
सगळेच आसपास असताना
का नसते कुणीच आपले मग,
शेवटच्या त्या क्षणाला...

का नसावी भिती
कुणाला कशाची ही
का विसरावे माणसाने
आपल्या जवळची नाती ही...

कृष्णा मला सांग
का मग जन्म घेऊनी
मरणाला सामोरे जायचे
आपल्यातल्याच एकाला का
झुरताना फक्त पाहायचे  ..

का जन्मदात्यांना भोगावे
लागती भोग सारे
मुलाच्या अर्थीला खांदा देणे
बापाला कधी झेपेल का रे...

कृष्णा मला सांग
का दिलीस गीतेची शिकवण
माणसं असती येथे पशु समान
का केलेस मग मौन धारण
तुही ऐन प्रसंगी सांग...

का म्हणावे देव तुजला
दिसे फक्त अंधार जेव्हा
का नसावी उत्तरे तुझ्याकडेही
आमच्या प्रश्नांना तेंव्हा...

कृष्णा मला सांग
का नसावी राधा लग्नाची
तुझ्यावर अमाप प्रेम करुन ही
मग कसा होशील मीरेचा तु
जर राधाही आजवर खोळंबली!!!

- मीरा पितळे