42 अनधिकृत बांधकामांना पालिकेची नोटीस

नवी मुंबई ः कोरोना संक्रमणामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासन गुंतले असल्याचा फायदा घेत शहरात भुमाफियांनी हातपाय पसरवायला सुुरुवात केली आहे. या काळात अनेक बेकायदा इमले शहरात उभे राहिले आहेत. अशा 42 बांधकामांना (माहे डिसेंबर) पालिकेने नोटीस पाठविली असून सदर इमारतीमध्ये कोणीही सदनिका तसेच गाळे खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. 

कोरोनाला अटकाव घालण्यात पालिका प्रशासन व्यस्त असल्याने अतिक्रमणावरील कारवाई थंड पडली होती. याचा फायदा घेत शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. खाडीकिनारी, गावठाण क्षेत्रात चाळींपासून ते चारमजली इमारतींचा यात समावेश आहे. कायदे आणि नियम धाब्यावर बसवून बांधकामे उभी राहत असल्याने दुर्घटना घडण्याची भिती व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीत अनधिकृत इमले उभे राहत असल्याने लोकांची फसवणुक होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील 42 अनधिकृत बांधकामांना पालिकेने महाराष्ट्र प्रोदशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये नोटीसा पाठविल्या आहेत. तसेच शासनाच्य ापरिपत्रकानुसार सर्व नागरिकांना सदर इमारती व बांधकामे ठिकाणी सदनिका व गाळे खरेदी न करण्याचे आवाहन पालिकेने जाहीर नोटीसीद्वारे केले आहे. या बांधकामामध्ये बेलापुरमध्ये 3, वाशीतील 14, तुर्भेतील 9, कोपरखैरेतील 4, घणसोलीतील 6, ऐरोलीतील 6 बांधकामांचा समावेश आहे. सदर ठिकाणी पाहणी केली असता, पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधित विकासक व बांधकाम करणार्‍या मालकाला एमआरटीपी अ‍ॅक्ट नुसार नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच सदर ठिकाणी कोणीही सदनिका तसेच गाळे खरेदी न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

  • या इमारतीमध्ये सदनिका व गाळे खेरदी न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. मात्र या इमारती उभ्या राहतातच कश्या असा प्रश्‍न नवी मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. बांधकाम सुरु असतानाच पालिका कारवाई का करत नाही असा सवालही उभा रहात आहे.