कोपर गावाच्या स्वयंभू गणेश मंदिराचे जल्लोषात उद्घाटन

नवी मुंबई ः कोपर गावाच्या गणेश मंदिराची पुनर्वसन क्षेत्रामध्ये पुन:स्थापना झाल्याचा तसेच विमानतळबाधित गावांतील ग्रामस्थांचा धार्मिक व सांस्कृतिक ठेवा आता नव्या रूपात जतन होत असल्याचा आनंद ग्रामस्थांप्रमाणेच सिडकोलाही आहे, असे उद्गार डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले. 

पुष्पक नोड या नवी मुंबई विमानतळबाधितांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात उभारण्यात आलेल्या कोपर गावाच्या श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिराचे उद्घाटन डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते 08 फेब्रुवारी, 2021 रोजी करण्यात आले त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. विमानतळबाधित कोपर गावाच्या श्री स्वयंभू चिंतामणी मंदिर हे भूखंड क्र.53, सेक्टर-आर4, पुष्पक नोड, येथे उभारण्यात आले आहे. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल उपस्थित होते. 

भारताच्या इतिहासात प्रथमच प्रकल्पबाधितांच्या चेहर्‍यावर मंदीराचे नवीन जागी उद्घाटन करताना आनंद, उत्साह व समाधान यांचे मिश्रण पहायला मिळाले. याचे कारण म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरीत होणार्‍या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना 22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत देशातील सर्वोत्तम पॅकेज देण्यात आले आहे. कोपर गाव ग्रामस्थांनीदेखील एक पाऊल पुढे येऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यास मोलाचे सहकार्य केले आहे. 

प्रकल्पबाधितांना देण्यात येणार्‍या सर्वोत्तम पॅकेजसोबतच प्रकल्पबाधितांच्या गाव मंदिरांसाठी सिडकोतर्फे पुनर्वसन व पुन:स्थापना क्षेत्रात भूखंडदेखील देण्यात आले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधित सर्व दहा गावांच्या मागण्यांनुसार त्यांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी एक भूखंड देण्यात आला आहे. सिडकोतर्फे गावातील मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी रू. 1 कोटी देण्यात आलेले आहेत. सिडकोने नेहमीच प्रकल्पबाधितांच्या सर्वंकष पुनर्वसनावर भर दिला आहे. याचाच परिपाक म्हणजे प्रकल्पबाधितांची सामाजिक गरज लक्षात घेऊन त्यांच्या मंदिरांसाठी सिडकोतर्फे भूखंड व मंदिर बांधकामासाठी निधी अदा केला आहे.