ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजेस व क्लासेस बंद ठेवण्याची मागणी

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा,कॉलेजेस व कोचिंग क्लासेस कोरोनाचा प्रादुर्भाव असेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी शिक्षण क्रांती संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजेस सुरू करण्यात आली आहेत. परंतु राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक शाळा महाविद्यालयांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. अनेक पालकांमध्येही संसर्ग वाढत आहे. त्याचाही परिणाम शिक्षक व विद्यार्थ्यांवर होत आहे. ग्रामीण भागातील शाळांत जाणारे शिक्षक मुख्यत्वे लोकल ट्रेन व बसेस अशा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करून शाळेत जात असतात. अशा पद्धतीने कोविडचा प्रसार मोठया प्रमाणात वाढत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील शाळा बंद ठेवाव्यात अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील यांच्याशी शिक्षण क्रांती संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी समक्ष भेटून चर्चा केली असता,जिल्हाधिकारी कार्यालयाने 18 मार्च 2021 रोजीच शाळा बंदचे आदेश संबंधितांना काढले आहेत असे डॉ.शिवाजी पाटील उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले. परंतु यात केवळ समाजकल्याण व आदिवासी विकास विभागातीलच शाळांचा उल्लेख असुन सर्वच शाळांचा त्यात समावेश करावा अशी विनंती शिक्षण क्रांती संघटनेने त्यांच्याकडे केली व त्याबाबतचे निवेदन दिले. या चर्चेनंतर लगेच ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधून याबाबत तातडीने पत्र काढावे अशी विनंती सुधीर घागस यांनी केली. यासंदर्भात लगेच पत्र काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.याप्रसंगी संघटनेचे ठाणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष दुर्जन भोईर, ठाणे शहर अध्यक्ष किशोर राठोड सर तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर गोसावी हे उपस्थित होते.