मॉर्निंग वॉक करणार्‍यांची अँटिजेन टेस्ट

28 हजारांची दंडात्मक रक्कम वसूल

नवी मुंबई ः संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉकला बाहेर पडणार्‍या नागरिकांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागामार्फत कारवाई तीव्र करण्यात आलेली आहे. आजही बेलापूर विभागातील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना उल्लंघन करणार्‍या 26 नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची अँन्टिजन टेस्टही करण्यात आली. त्यामधील प्रौढ 17 नागरिकांकडून प्रत्येकी 1 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

अशाचप्रकारची कार्यवाही नेरुळ विभागात पामबीच सर्व्हीस रोडवर करण्यात येऊन त्याठिकाणी 34 नागरिकांची अँन्टिजन टेस्ट करण्यात आली. तसेच 11 प्रौढ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे प्रतिबंधीत आहे. त्यामुळे मॉर्निंग / इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडणार्‍या नागरिकांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस संयुक्तपणे कारवाई करीत असून नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.