पार्थमुळे पवारांच्या अडचणीत वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 07, 2025
- 57
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरेदी-विक्री खत रद्द; चौकशीचे आदेश
मुंबई : पुण्यातील कोरगाव जमीन अनियमितता प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत. या व्यवहारावरुन विरोधकांनी आरोप केल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पार्थ पवारांचे एफआयआरमध्ये नाव नसल्याने विरोधकांना चांगलाच मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिळाला आहे. अजित पवारांनी शुक्रवारी याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला मात्र पार्थने आयते कोलीत फडणवीसांच्या हाती दिल्याने अजितदादांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींत खरेदी केली. इतकेच नाही तर त्यासाठी केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरले. या व्यवहारावरुन विरोधकांनी आरोप केल्यानंतर अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र बाळकृष्ण तारू आणि शीतल किशनचंद तेजवाणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कंपनीची 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांचे एफआयआरमध्ये नाव नसल्याने विरोधकांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधला. त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली असून तथ्य समोर आल्यावर दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले. लागोलाग अजित पवार यांनी 7 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली. कोरेगाव पार्क प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नोंदणी कार्यालयात जी काही नोंदणी झाली होती, तीही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता, याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती संपूर्ण चौकशी करेल, त्या चौकशीत सर्व घटनाक्रम पुढे येईल. कोणी मदत केली, कुणाचे फोन गेले हे सगळं समोर येईल. मात्र, मी नेहमीच माझ्या स्वकीयांना, नातेवाईकांनाही सांगतो, नियमाच्या बाहेर जाऊन केलेलं मला चालणार नाही, असे अजित पवार यांनी सांगत प्रकरणातील गांभिर्यता कमी करण्याचा प्रयत्न केला.
मी आजपर्यंतच्या राजकीय जीवनात नियम तोडून काम केलेलं नाही. या व्यवहारात मला अजिबात काही माहिती नव्हतं. मला माहिती असतं तर लगेच सांगितलं असतं मला विचारुन व्यवहार झालेला आहे. साहजिकच विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार, त्यामध्ये दुमत नाही. मात्र, मला आजच माहिती मिळाली की, याप्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील 1 महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
- पार्थ वर एफआयआर कधी?
ही जमीन सरकारी आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ही पूर्वीची महार वतनाची जमीन आहे अशा अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. या संदर्भातच समिती चौकशी करणार आहे. तीन जणांच्या विरुद्ध एफआयआर दाखल आहे त्यांचीही चौकशी होईल. कंपनीची मालकी पार्थ पवार यांच्याकडे असताना फक्त भागीदार व मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर बिल फाडण्यात आल्याची चर्चा आहे. जे लोक व्यवहाराच्या नोंदणीसाठी कार्यालयात आले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पण ज्या लोकांनी मार्ग (पार्थ) दाखवला त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- अमेडिया कंपनीचे भागीदार कोण?
अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीमध्ये पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील नोंदींनुसार, या कंपनीची आर्थिक खाती अत्यंत अल्प व्यवहार दर्शवितात. कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 ते 2024-25 या काळात कोणत्याही व्यवसायातून उत्पन्न नोंदवलेले नाही. - दादांची सारवासारव
राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने मला सर्व अधिकाऱ्यांना सूचना करायच्या आहेत की, येथून पुढे तुमच्या समोर कुठल्याही प्रकारचे प्रकरण आले आणि ते नियमानुसार नसेल तर अजिबात प्रेशरखाली न येता सरळ त्यावर काट मारायची. कुणीही माझा जवळचा नातेवाईक असो नाही तर माझ्या नावाचा कुणी वापर करत असेल तरीही. हे मला चालत नाही आणि चालणारही नाही.
- जमिनी खरेदी -विक्रीत नेमकं काय झालं?
आर्थिक वर्ष 2024-25 अखेर पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील या दोन्ही भागधारकांची भांडवलाची एकूण रक्कम 2 लाख 57 हजार 568 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पार्थ पवार यांच्या भांडवली खात्यात 1.58 लाख रुपयांची शिल्लक असल्याची नोंद आहे. या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता नसून, एका खासगी बँकेत 2 लाख 47 हजार रुपये आणि 10 हजार रुपये रोकड एवढाच निधी असल्याचा तपशील आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai