ठाण्याचे निवडणूक प्रभारी वनमंत्री गणेश नाईक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 07, 2025
- 58
नवी मुंबई ः गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद चर्चेत असल्याने महायुतीत काही आलबेल नसल्याचे दिसते. त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून महायुतीत फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यासह ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणूका येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापैकी नगरपालिका निवडणूकांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. या निवडणूका तोंडावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी सांयकाळी केली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मिरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा सामावेश आहे.
नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवित असताना प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक विभागासाठी काही निवडणूक प्रमुखही निश्चित केले आहेत. यामध्ये ठाणे शहर- आमदार संजय केळकर, ठाणे ग्रामीण- माजी खासदार कपिल पाटील, भिवंडी-आमदार महेश चौघुले, मिरा भाईंदर आमदार नरेंद्र मेहता, नवी मुंबई माजी खासदार संजीव नाईक, कल्याण-नाना सुर्यंवशी, उल्हासनगर-प्रदीप रामचंदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई-विरार आणि पालघर भागासाठी आमदार राजन नाईक आणि बाबाजी काठोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आले आहे. तर रायगड उत्तर आणि रायगड दक्षिणची जबाबदारी अनुक्रमे प्रशांत ठाकूर आणि सतीश धारप यांना देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढावी या मताचे नाईक आहेत. पक्षाने मला संधी दिली तर ठाण्यात देखील ‘कमळ’ उगवून दाखवेल, असे वक्तव्य नाईक यांनी मध्यंतरी केले होते. या पार्श्वभूमीवर नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारीपद सोपवून भाजपने शिंदे यांनाच एकप्रकारे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली आहे. नवी मुंबईतही भाजपमध्ये नाईक विरुद्ध आमदार मंदा म्हात्रे असा सामना रंगलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे निवडणूक प्रमुखपद संजीव नाईक यांच्याकडे सोपवून भाजपने तेथेही शिंदे सेनेशी दोन हात करण्याची तयारी दाखविल्याचे चित्र आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai