लशींचा दुसरा डोस देण्याला प्राधान्य

नवी मुंबई : लस तुटवड्यामुळे शासनाने 45 वर्षांवरील नागरिकांना दुसर्‍या मात्रेला प्राधान्य देण्याच्या सूचना आल्यानंतर गुरुवारी पालिका क्षेत्रातील पालिकेच्या सर्वच 32 केंद्रांवर दुसरी मात्रा दिली जाणार आहे. पालिका रुग्णालयांत 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सध्या स्थगित करण्यात आले आहे. तर अपोलो या खासगी रुग्णालयात 18 वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी 850 रुपयांत शासकीय नियमानुसार दिली जाणार आहे.

नवी मुंबई शहरात काही दिवसांपासून सातत्याने लसतुटवडा जाणवत असल्याने लसीकरणात वारंवार अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासन तसेच 45 वयोगटापासून पुढील नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून लसपुरवठा केला जात आहे. परंतु नुकतेच राज्य शासनाकडून पालिका रुग्णालयांत नागरिकांना दुसरी मात्रा देण्यासाठी प्राधान्य दिले असून पालिका रुग्णालयांत 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सध्या स्थगित करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या वयोगटातील व त्यावरील सर्व नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येणार आहे. पालिकेच्या 32 केंद्रांवर लसीकरण व्यवस्था करण्यात आल्याची माहिती लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली. पालिकेला बुधवारी 7 हजार कोव्हिशिल्ड लस प्राप्त झाली आहे. त्यामुळे ही लस घेतलेल्यांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे. 

18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केवळ अपोलो रुग्णालयात 
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 57 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची पालिकेने परवानगी दिली आहे. परंतु एकमेव अपोलो रुग्णालयातर्फे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. 850 रुपयांत सरकारी नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व पात्र व्यक्तींना लस दिली जात आहे. 3 मे पासून येथे लसीकरणास सुरुवात झाली आहे. या रुग्णालयामार्फत प्रतिदिन 1 हजार जणांना लसीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे कंपन्या व खासगी सोसायट्यांमधील लसीकरणाबरोबरच खारघर येथील सरस्वती इंजिनीअर कॉलेज व वाशी मॉडर्न कॉलेज लसीकरणासाठी परवानगी मिळाली असल्याची माहिती अपोलो रुग्णालयामार्फत देण्यात आली.