राज्यात होणार ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा

22 निकषांवर गुणांकन; प्रथम क्रमांकास 50 लाखांचे बक्षिस

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50  लाख, 25 लाख आणि 15 लाख  असे 3 विभागवार पुरस्काराची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. 

जगभर थैमान घातलेल्या कोरोना संक्रमणला अटकाव घालण्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. आपले गाव कोरोनामुक्त केले तर तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे गावागावांमध्ये कोरोना मुक्तीसाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे  व त्यासाठी स्पर्धा ठेवणे, त्यांचा गौरव करणे व विकासकामांच्या निधीमधून जादाचा निधी दिला तर जास्त प्रभाव पडेल. या हेतुने कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजना राबविण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायतीच्या स्तरावर वेगवेगळ्या 5 पथकांची स्थापना करुन त्यांनी दिलेले कार्य करणे गरजेचे आहे. त्यांनी दिलेल्या निकषांनुसार गुणांकन करणे व ग्रामपंचायतीने स्वयंमुल्याकन संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. 

कोरोना मुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. 6 महसुली विभागात प्रत्येकी  3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षिसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच करोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • पाच पथकांमध्ये कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन कार्य करणे, कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणार्‍या वाहन चालकांचे पथक, कोव्हिड हेल्पलाईन पथक, कोविड-19 लसीकरण पथकांचा समावेश असेल.