Breaking News
मतचोरीचा गांधींकडून आरोप; शपथपत्र देण्याचे आवाहन
नवी दिल्ली ः राहुल गांधी यांनी बिहारमधील मतदार यादी पुर्नसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीतील हेराफेरीबाबत पुरावे सादर करुन अशाप्रकारे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी कर्नाटकतील महादेवपुरा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीतील घोळ समोर आणून निवडणुक आयोगाने भाजपच्या इशाऱ्यावर सदर काम केल्याचा आरोप करुन निवडणुक आयोगाच्या निस्पृहतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दरम्यान निवडणुक आयोगाने राहुल गांधींनी याबाबत पुराव्यासह शपथपत्र दाखल करण्याचे आवाहन केल्याने या लढाईने आता निर्णायक वळण घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महाराष्ट्रासह चार राज्यात झालेल्या निवडणुकीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्याच्या विधानसभा मतदार संघात धक्कादायक मतदार नोंदणी झाल्याचा आरोप निवडणुक निकालानंतर केला होता. याबाबत त्यांनी सुरु असलेल्या लोकसभा अधिवेशनात संसदेत चर्चा व्हावी म्हणून सभापती ओम बिर्ला यांचेकडे मागणी केली आहे. त्याला अनुसरुन देशात माहौल तयार व्हावा म्हणून त्यांनी निवडणुक आयोग निःस्पृह नसल्याचे दाखवण्यासाठी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभेच्या मतदार यादीतील हेराफेरीचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले. या मतदार यादीत पाच मार्गांनी मतदान चोरी झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामध्ये दुबार मतदारांची नावे असणे, एका मतदाराचे नाव अनेकदा असणे, खोटे पत्ते व तपशील देणे, बनावट ओळखपत्र तयार करणे या पद्धतीने मतदार याद्या बनवण्यात आल्याचे धक्कादायक पुरावे त्यांनी सार्वजनिकरित्या सादर केले.
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीनंतर राज्यात 76 लाख मतदारांची नावे अशाच पद्धतीने नोंदवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुक व महाराष्ट्र विधानसभा निवडणुक या दरम्यान महाराष्ट्रात 46 लाख नवीन मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एकाच पत्यावर 40-40 मतदारांची नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले असून नगरमधील एकाच इमारतीत हजाराहुन अधिक मतदारांची नोंदणी केली आहे. काही मतदारांच्या यादीत अनेक मतदारांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिले नसून अनेकांच्या घरांच्या पत्त्यांचा उल्लेखही नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. 11 हजार नागरिकांनी 3 वेळा मतदान केल्याचे त्यांनी यावेळी पुराव्यासह दाखवले. त्यामुळे बनवल्या जाणाऱ्या मतदार याद्यांबाबत राहुल गांधी यांनी पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित करुन निवडणुक आयोगाच्या निस्पृहतेवर बोट ठेवले आहे. आम्ही निवडणुक आयोगाकडे या याद्यांचा इलेक्ट्रॉनिक डाटा मागत असून आयोग आम्हाला तो देण्यास गेले वर्षभर टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक मतदार यादी उपलब्ध झाल्यास निवडणुक आयोगाच्या मतदार यादीतील हेराफेरीवर आपण अधिक प्रकाश पाडू असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या या हल्ल्यानंतर निवडणुक आयोगाने संबंधित आरोप शपथपत्रावर करण्यास राहुल गांधी यांना सांगितले असून त्याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणुक आयोगाच्या या आवाहनास राहुल गांधी कसा प्रतिसाद देतात याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai