आशा स्वयंसेविकांना मिळणार विशेष भत्ता

नवी मुंबई ः कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 31 जुलै पर्यंत 45 वर्षावरील सर्व नवी मुंबईकर नागरिकांना कोव्हीड लसीचा किमान 1 डोस दिला जावा अशाप्रकारे कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात आरोग्य विषयक माहिती प्रसारित करण्याचे काम करणार्‍या आशा स्वयंसेविकांवर या लसीकरणाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अशाप्रकारचा आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला असून या कामाकरिता आशा स्वयंसेविकांना प्रति लाभार्थी, प्रति डोस रु.10 इतका प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्याप्रमाणे एन.एच.एफ.एस.-5 च्या अहवालानुसार एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के इतकी 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची सर्वसाधारणपणे संख्या असते. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यमान 15 लक्ष लोकसंख्या गृहीत धरल्यास 4.5 लक्ष इतकी 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या होईल. या सर्व लाभार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन आता आशा स्वयंसेविका 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत व प्रवृत्त करणार आहेत.

आता आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत लसीकरणाची योग्य माहिती पोहचविली जाणार आहे व लसीकरणासाठी प्रोत्साहीत करून लस घेतल्याबद्दल आशा स्वयंसेविकांना प्रति लाभार्थी रु. 10 इतका विशेष भत्ता मिळून त्यांचे आर्थिक सक्षमीकरणही होणार आहे. नवीमुंबई पालिका क्षेत्रातील कोव्हीड लसीकरणाला गतीमानता प्राप्त करून देणारा पालिकेचा निर्णय आशा स्वयंसेविकांना दिलासा देणारा आहे.