सिडकाने महामेट्रोला दिले स्वीकारपत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 16, 2021
- 415
परिचालन आणि देखभाल सेवाची जबाबदारी महामेट्राकडे
नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन आणि देखभाल (ऑपरेशन अॅन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र (एलओए) देण्यात आले. या संदर्भात लवकरच सिडको आणि महा मेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 कि.मी. च्या 11 स्थानकांसह तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणार्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, तसेच या क्षेत्रातील महामेट्रोचा अनुभव व कार्यकुशलता विचारात घेऊन सिडकोने महा मेट्रोची नियुक्ती केली. महा मेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महा मेट्रोकडून 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर मार्गावरील परिचालन आणि देखभाल सेवांकरिता सिडकोला रु. 885 कोटी इतका खर्च अंदाजित आहे. महामेट्रोशी परिचालन आणि देखभाल सेवा प्रदान करण्याच्या कराराचा कालावधी हा, या मार्गावर वाणिज्यिक परिचालन सुरू होण्याच्या तारखेपूर्वी 1 वर्ष आणि वाणिज्यिक परिचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून पुढील 10 वर्षे इतका असणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.
मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर परिचालन आणि देखभाल सेवा पुरविण्याकरिता सिडकोकडून महा मेट्रोला स्वीकारपत्र देण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील कामे वेगाने पूर्ण होऊन, लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य होईल. सिडकोच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याचाच प्रारंभ मेट्रो प्रकल्पाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने झाला आहे.- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महा मेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai