31 जुलैला साडे 6 कोटीहून अधिक कर संकलन

पनवेल : महापालिकेने सुरु केलेल्या नव्या करप्रणालीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. 31 जुलै ही 17 टक्के कर सवलत मिळण्याची शेवटची तारीख असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला. या दिवशी सहा वाजेपर्यंत सहा कोटींच्यावर कर संकलन झाले असून आजवरचे हे सर्वाधिक कर संकलन आहे.आत्तापर्यंत एकुण 38.87 कोटी मालमत्ता कराचे संकलन झाले आहे.

 रविवारी नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आसूडगाव या भागामधून सर्वाधिक भरणा होताना दिसून आला. नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद पहाता मालमत्ता धारकांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी शनिवारची शासकिय सुट्टी रद्द करण्यात आली होती. चारही प्रभाग कार्यालय व मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले होते. या आवाहनाला पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

आजवर झालेल्या सुनावण्या दरम्यान नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन होत असल्याचे दिसून आले आहे. गेले काही दिवसापासून दिवस व रात्रपाळी मध्ये नागरिकांच्या नावामध्ये,पत्त्यामध्ये, सोसायटीच्या नावात,सदनिका नंबर यामध्ये त्वरीत दुरूस्ती करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटत असल्याने मालमत्ता कर भरण्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सवलतीच्या शेवटच्या दिवशीही पालिकेच्या सर्वच नोडमधून कराचा मोठा भरणा होताना दिसून आले.

  • 31 जुलैचे दैनिक संकलन
नोड                                                     एकूण कर संकलन
1. पनवेल                                              18 लाख 86 हजार 752
2. नवीन पनवेल,मोठा खांदा, खांदा कॉलनी,आसुडगाव     2 कोटी 61 लाख 90 हजार 786
3. कामोठे                                              1 कोटी 18 लाख 85 हजार 717
4. खारघर                                              1 कोटी 64 लाख 49 हजार 116
5. कळंबोली, रोडपाली                                  61 लाख 20 हजार 482
6. तळोजा,पाचनंद,नावडे                                 15 लाख 61 हजार 114
एकूण कर संकलन                                       6 कोटी 40 लाख 93 हजार 994