धोकादायक इमारत खाली करण्याची नोटीस

इमारत खाली करण्यास वेलफेअर असोसिएशनचा विरोध

नवी मुंबई :  एपीएमसीच्या मसाला मार्केट (विकास टप्पा 2, मार्केट 1) मधील मध्यवर्ती सुविधा इमारत नवी मुंबई महानगरपालिकेने जूनमध्ये अतिधोकादायक घोषित केली आहे. ही इमारत वापरासाठी बंद करून तत्काळ खाली करण्याची सूचना बाजार समितीला केली आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने  इमारतीमधील कार्यालयांना नुकतीच अंतिम नोटीस बजावली आहे. दरम्यान, इमारत दुरूस्त होण्याची शक्यता असताना तत्काळ खाली करण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल करत सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींग मुडी बाजार वेलफेअर असोसिएशनने इमारत खाली करण्यास विरोध केला आहे.  

एपीएमसीने प्रत्येक बाजार आवारात मध्यवर्ती सुविधा इमारत बांधली आहे. मसाला मार्केट मधील या मध्यवर्ती सुविधा इमारतीमध्ये 272 कार्यालये आहेत. या इमारतीची देखभाल दूरूस्तीअभावी दूरवस्था झाली असून इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले आहे. भिंतीचे प्लास्टर कोसळले आहे. नवी मुंबई महापालिकेकडून सूचना आल्यानंतर एपीएमसीने येथील कार्यालयांना इमारत खाली करण्याच्या वारंवार सूचना दिल्या आहेत. पंरतू, बाजारसमितीने पुर्नबांधणीचे धोरण ठरवावे व  अन्य ठिकाणी आमचे तात्पुरते स्थलांतर करावे अशी भूमिका वेलफेअर असोसिएशनने घेतली असून इमारत खाली करण्यास विरोध केला आहे. तसेच कोणतीही कारवाई केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे. बाजार समिती आमच्या प्रस्तावाकडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींग मुडी बाजार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम भणगे यांनी केला आहे.

  • मसाला मार्केटमध्ये स्लॅब कोसळला
     एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतू या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 
     मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत कोणाचीही जीवितहानी झाली नसली तरी भीतीचे वातावणार पसरले आहे. 
     एफ विंग मधील दोन दुकानांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या पॅसेजमध्ये ही घटना घडली.