Breaking News
आरोपीकडून 73 लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई : चारचाकी वाहने भाड्याने घेऊन फसवणुक करण्याच्या गुन्ह्यांत वाढ होताना दिसत आहे. अशाच प्रकारचा गुन्हा नवी मुंबई पोलीसांनी उघडकीस आणुन दुबईत पळून जाण्याच्या तयारीत असणार्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचबरोबर जवळपास 73 लाखांच्या 23 चारचाकी जप्त केल्या आहेत. यापूर्वी पोलिसांनी अशाच प्रकारे गुन्हा करणार्यांकडून अडीच कोटींच्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
रॉयल कार सेल्फ ड्राईव्ह नावाची कंपनी चालू करुन त्याद्वारे जाहिरात देऊन मोठ्या भाड्याचे अमिष दाखवून नवीन गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जात होत्या. दोन-तीन महिने भाडे देवून नंतर कार परस्पर गहाण ठेवली जात असे. अशाप्रकारे हि कंपनी गाडी मालकांची फसवणूक करत होती. याबाबत वाशी पोलीस ठाणे हद्दीतील ड्राईव्ह ईजी कार कंपनीच्या 23 कार भाडयाने घेऊन त्यांना भाडे व कार परत न देता त्यांच्या गाड्यांचा अपहार केल्याचा गुन्हा वाशी पोलीस ठाणे आणि खारघर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आरोपी संदीप रघु शेट्टी याने ड्राईव्ह ईजी कंपनीच्या 23 छोट्या-मोठ्या कार ठरलेल्या रकमेवर जुलै-2021 भाड्याने घेतल्या होत्या. सदर कारचे दोन महिने वेळेवर भाडे देवून ऑगस्ट-2021 पासून भाडे व कार परत देण्यास संदीप शेट्टी नकार देवू लागला. त्यामुळे संदीप शेट्टी याने ड्राईव्ह ईजी कंपनीची अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाल्याने कंपनीचे मॅनेजर इम्रान ब्रेग यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने लॉकडाऊनमधील नुकसान झालेल्या लोकांचा फायदा घेऊन गाड्या भाड्याने घेत होता. परस्पर या गाड्या गहाण ठेवून त्यांच्याकडून अंदाजे 50 ते 60 लाख रूपये गोळा केले होते. आरोपी हा खारघर येथे उच्चभ्रू वस्तीत भाड्याने राहून ऐशोआरामात जीवन जगण्यात खर्च करत होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai