Breaking News
तिसरा फरार ; 4.25 लक्ष किंमतीच्या 8 दुचाकी
नवी मुंबई : नवी मुंबईतून दुचाकी वाहनांची चोरी करणार्या सराईत बाल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 8 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हेगारांना पकडण्यात आलं आहे. तर तिसरा आरोपी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या टोळीला यापूर्वीदेखील अटक झाली आहे. अल्पवयीन असल्याचा फायदा त्यांच्याकडून घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेरुळ व उलवे परिसरात वास्तव्याला असलेले काही बाल गुन्हेगार वाहनचोरी करीत असल्याची माहिती मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, हवालदार लक्ष्मण कोटकर आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन चोरांची चौकशी केली असता त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून चोरीच्या रु. 4.25 लक्ष किंमतीच्या 8 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्यांनी ठाणे, नवी मुंबई परिसरातील त्यांच्या मित्रांकडे लपविल्या होत्या. त्यांचा अल्पवयीन तिसरा साथीदार पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. या अल्पवयीन टोळीने यापूर्वीदेखील शहरात वाहनचोर्या केल्या आहेत. त्यामध्ये यापूर्वीदेखील त्यांना अटक झालेली आहे. यानुसार आजवर या टोळीकडून 20 हून अधिक दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
गुन्हा करुनही केवळ अल्पवयीन असल्याने आपल्यावर कठोर कारवाई होत नसल्याचा फायदा या टोळीकडून घेतला जात आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई झाल्यास बालसुधारगृहात राहून आल्यानंतर ते पुन्हा वाहनचोरी करायचे. चोरलेल्या मोटरसायकल मौजमजेसाठी वापरल्यानंतर, त्या ओळखीच्या मित्रांकडे ठेवून द्यायचे. त्यामुळे एकापेक्षा अधिक गुन्हे करणार्या अल्पवयीन मुलांबाबत देखील कठोर कारवाईची कायद्यात तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai