शिवसेना जिल्हाप्रमुखपदी मोरे व भोईर यांची नियुक्ती

विजय नाहटा यांना सेनेत झुकते माप

नवी मुंबई ः गेल्या चार वर्षापासून रिक्त असलेले शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुखपद अखेर जाहीर करण्यात आले असून यावेळी विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर यांची वर्णी लावली आहे. या नियुक्तीमध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या गटाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झुकते माप दिल्याने  नेतृत्वाबाबत योग्य तो संदेश नवी मुंबई शिवसैनिकांना या नियुक्तीतून दिला आहे. 

गेले चारवर्षे नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुखपद रिक्त असल्याने या पदावरील नियुक्तीच्या अनेक उलटसूलट बातम्या प्रसिद्ध होत होत्या. यापुर्वी ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईचा कारभार पाहिला जात होता. जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करताना नवी मुंबईसाठी स्वतंत्र जिल्हाप्रमुखपद निर्माण करुन कै. तुकाराम नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेने नवी मुंबईतही बेलापुर व ऐरोली मतदारसंघ निहाय उत्तर व दक्षिण जिल्हाप्रमुखपद निर्माण करुन सेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विठ्ठल मोरे व विद्यमान नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांची नियुक्ती करुन 2019 च्या निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. या नेमणुकीमध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे वर्चस्व दिसत असून यावेळी आगामी निवडणुका नाहटा यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील असा स्पष्ट संदेश या नेमणुकीतून शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.