शिरवणेत पुन्हा बारबाला हटाव मोहीम

नवी मुंबई ः बारबालांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या शिरवणेतील ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ‘एक सही गावासाठी, बारबाला हटविण्यासाठी, लॉजिंग उठवण्यासाठी’ ही सह्यांची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. 

शिरवणे गाव उच्चशिक्षितांचे गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र गावात आणि गावाभोवती झालेल्या गरजेपोटीच्या बांधकामांतील घरे भाड्याने देऊन अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले. यामध्ये जास्त भाडे मिळते म्हणून दलालांच्या प्रलोभनाला बळी पडून ग्रामस्थ बारबालांनाही घरे भाड्याने देऊ लागले. त्यामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश बारमध्ये काम करणार्‍या बारबालांचे वास्तव्याचे ठिकाणी शिरवणे बनले. दरम्यान, शिरवणे ग्रामविकास मंडळ व ग्रामविकास युवा मंच यांनी एकत्रित येऊन गावकीच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन बारबालांचे वास्तव्य वाढल्याने होत असलेल्या परिणामांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना पटवून दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी बैठकींमध्ये बारबाला हटाव मोहिमेचा ठराव करण्यात आला. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी ‘बारबाला हटाव’साठी जनजागृती रॅली काढून त्यांना घरे भाड्याने देऊ नका, असे आवाहन ग्रामस्थांना केले होते. तसेच, गावातील बारबालांनी दोन महिन्यांत घरे रिकामी करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, रविवारी ‘एक सही गावासाठी, बारबाला हटविण्यासाठी... लॉजिंग उठविण्यासाठी’ हा उपक्रम हाती घेऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आल्याचे शिरवणे ग्रामविकास युवा मंचच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.