शासकीय कर्मचार्‍यांच्या संप सुरुच

मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारी संप सुरू केला. राज्य शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. कर्मचारी मोठ्याप्रमाणात संपामध्ये सहभागी झाले. सरकारी कार्यालयं, महसूल विभाग, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सगळेच संपामध्ये हिरीरीनं सहभागी झाले. रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि परिचारीका संपावर आहेत. त्यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. 

राज्यव्यापी सरकारी कर्मचार्‍याच्या संपाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. राज्यात आंदोलनांचं लोण सुरू असताना संपाची वेळ चुकीची असल्याचं सांगत कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी रावते यांनी केली. तसंच त्यावर भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. मात्र हे प्रकरण एवढे वाढले की बाकीचे उपस्थित मंत्रीही क्षणभर अवाक झाले. अखेर मुख्यमंत्रीसह इतर मंत्री यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले.