Breaking News
आ. मंदा म्हात्रे यांचा विरोध ; अधिकार्यांवर कारवाईची मागणी
नवी मुंबई ः सिडकोने 2008 साली नेरुळ सेक्टर 46 मध्ये 47000 चौ.मी भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी मे. मेट्रोपोलीस हॉटेलला भूखंड वितरीत केला होता. सदर भूखंडाचे दोन भाग करुन त्याच्या भूवापर बदलास सिडकोने मंजूरी दिली आहे. दोन्ही भूखंडांना रहिवासी आणि वाणिज्य वापर मंजूर झाला असून ते दोन्ही भूखंड नवी मुंबईतील नामवंत विकसकांस विकण्यात आले आहेत. जर भूवापर बदलास मंजूरी मिळाली असेल तर सिडकोने भूवापर बदल करुन निविदा का मागवल्या नाही असा प्रश्न विकासकांनी उपस्थित केला आहे.
2008 साली सिडकोने नेरुळ येथे 47000 चौ.मी भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी निविदा मागविली होती. सदर भूखंड उद्योगपती अविनाश भोसले यांच्या मालकीच्या मेट्रोपोलीस हॉटेलला वितरीत करण्यात आला होता. सदर भूखंड वापट सिडकोने शासनाच्या चौकशी समितीच्या शिफारशीवरुन 2011 मध्ये रद्द केला होता. सिडकोचे वरील आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करुन भूखंड वाटप आणि भूवापर बदल नियमीत केला. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अविनाश भोसले यांना दिलासा दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मेट्रोपोलीस हॉटेलला दिलेल्या भूखंडापैकी 24000 चौ.मी.चा भूखंड अविनाश भोसले यांनी डिसेंबर 2021 मध्ये बालाजी कॉर्पोरेशन यांना 473 कोटी रुपयांना विकला. या करारनाम्यात सदर भूखंडाचा हॉटेलसाठी असलेला भूवापर रहिवासी आणि वाणिज्य वापरासाठी बदल करुन देण्याची जबाबदारी मेट्रोपोलीस हॉटेलच्या प्रवर्तकांवर ठेवण्यात आली होती. या भूखंडाचाही वापर बदल सिडकोने मंजूर केला असून अखेर पंचतारांकित हॉटेलसाठी राखीव असलेला भूखंडावर रहिवास आणि वाणिज्य वापर करणे विकासकांना शक्य होणार आहे.
यापैकी 23000 चौ.मी.च्या भुखंडाला सिडकोने 2010 सालीच रहिवासी-वाणिज्य वापर मंजूर केला होता. सदर भूखंडाचा करारनामा त्यावेळी भोसले यांच्या शिषिर रियालिटी प्रा. लि. सोबत करण्यात आला होता. हा भूखंड घेण्यासाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि. कडून घेतलेले 204 कोटी रुपयांचे कर्ज वेळेत न फेडल्याने सदर भूखंडाचा लिलाव ‘सरफेसी’ कायद्याअंतर्गत करण्यात आला होता. सदर भूखंड नवी मुंबईतील व्हिजन इन्फ्रा या कंपनीचे भागीदार अंबालाल गामी व इतर यांच्यामार्फत 315 कोटींना खरेदी करण्यात आला. याबाबतचे ट्रायपार्टी अग्रीमेंट करण्यात आले असून सदर भूखंड व्हिजन इन्फ्रा या भागीदारी कंपनीच्या नावाने करण्यात आले आहे.
पंचतारांकित हॉटेलसाठी निविदा मागवून नंतर सदर भूखंडाचा भूवापर बदल करण्याच्या सिडकोच्या या निर्णयावर अनेक विकसकांनी नापसंती दर्शवली आहे. भूवापर बदल करुन सिडकोनेच निविदा मागवल्या असत्या तर सिडकोला अधिक नफा मिळाला असता अशी चर्चा नवी मुंबईतील विकासकांत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे