शिंदे गटाचा ‘विजय’ खडतर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2022
- 1178
- निवडणुकीत भाजपासोबत युतीची शक्यता नाही
नवी मुंबई ः राज्यात सेनेच्या बंडखोर शिंदे गटाने भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली असली तरी हा फॉर्म्युला नवी मुंबईत पालिका निवडणुकीत राबवणे अशक्य आहे. नवी मुंबईत महाविकास आघाडी, बंडखोर शिवसेना व भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचा ‘विजय’ खडतर मानला जात आहे.
नवी मुंबई महापालिकेत गेली 30 वर्ष गणेश नाईक यांनी निरंकुश सत्ता उपभोगली आहे. यावेळी राज्यात सत्तांतर होण्यापुर्वी गणेश नाईक यांची सत्ता नवी मुंबई महापालिकेतून जाईल असे वातावरण होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन राज्यात भाजप व बंडखोर शिवसेनेचे नवीन सरकार अस्तित्वात आणले. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नवी मुंबई शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऐरोलीतील चौगुले गटाचा समावेश आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनीही शिवसेेनेला जय महाराष्ट्र करुन शिंदेंची साथ दिल्याने गणेश नाईक यांची महापालिका निवडणुकीत बाजू मजबुत झाली आहे.
दिघ्यातील गवते कुटुंबियांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्याने ऐरोलीतून अधिक जागा मिळवण्याच्या नाईक गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेनेतील लोकप्रतिनिधी शिंदे गटात तर पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे चित्र राज्यात असल्याने नवी मुंबईत बंडखोरी केलेल्या सेना उमेदवारांचे राजकीय भवितव्य अधांतरी राहणार आहे. या दुफळीचा फायदा होणार असल्याने शिंदे गटासोबत गणेश नाईक युती करण्याची शक्यता कमी असल्याने शिंदे गटातील अनेक नगरसेवक पुन्हा नाईकांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाचा विजय खडतर मानला जात आहे. दरम्यान, मध्यंतरी वाशी येथील उड्डाणपुल बांधण्याच्या कामावरुन एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्यावरुन भविष्यात शिंदे-नाईक जवळ येण्याची शक्यता नाही. परंतु, फडणवीसांनी दबाव टाकल्यास शिंदे गटासोबत नाईक यांना जुळवून घ्यावे लागेल असे बोलले जात असले तरी स्वाभिमानी नाईक त्यास कितपत महत्व देतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
- बंडखोरीला अर्थकारणाचे पाठबळ
नवी मुंबई शिवसेनेत झालेली बंडखोरी ही वैचारिक बंडखोरी नसून तिला एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळणारी आर्थिक रसद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना शिंदे यांनी शेकडो कोटींची कंत्राटे दिल्याची चर्चा असून झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळ व पर्यावरण महामंडळावरील नियुक्ती आबाधीत ठेवण्यासाठी विजय नाहटा यांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे. - शिंदेंमुळे चौगुलेंचे महापौरपद हुकले?
नवी मुंबईतून शिवसेनचे कणखर नेतृत्व उभे राहावे अशी एकनाथ शिंदे यांची ईच्छा नसल्याचे बोलले जाते. मागील वेळी शिवसेनेचा महापौर बनणे दृष्टीक्षेपात असूनही शिंदेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी महापौरपदाबाबत बोलणी न केल्याने भाजपने मतदान करण्यास विरोध केला. त्यामुळे शिवसेनेच्या चौगुलेंचा विजय हुकल्याची चर्चा त्यावेळी होती. - गणेश नाईक यांचे पारडे जड
आ.गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थक नगरसेवकांनी शिवसेना व राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी शिंदेच्या नेतृत्वाखाली भाजपातून शिवसेनेत गेलेल्या नवी मुंबईतील नगरसेवकांनी आता राज्यातील सत्तांतरानंतर आ. गणेश नाईक यांच्या छत्रछायेखाली पुन्हा घरवापसी करण्यास सुरुवात केली आहे. दिघ्यातील गवते कुटुंबियांपाठोपाठ तुर्भे व कोपरखैरणेतील नगरसेवकही नाईकांच्या आश्रयाला येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी नाईकांचे पारडे जड झाल्याची चर्चा आहे.
पालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र येण्याची अपेक्षा असतानाच नाईकांनी गवते कुटुंबियांना भाजपात दिलेला प्रवेश योग्य नाही. त्यामुळे नाईकांनी वर्तन सुधारले नाही तर भविष्यात आम्ही दिलेले धक्के त्यांना भारी पडतील - विजय चौगुले
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai