Breaking News
नागरिकांना सूचना व हरकतींसाठी 60 दिवसांचा कालावधी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका स्थापनेपासून गेली 30 वर्ष प्रलंबित असलेल्या प्रारुप विकास आराखड्याची कवाडे जनतेच्या सूचना व हरकतींसाठी खुली झाली आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 26(1) अन्वये महापालिकेने सदर प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला असून नागरिकांना सूचना व हरकती सादर करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी दिला आहे. हा विकास आराखडा पुढील 20 वर्षाचे नियोजन करुन करण्यात आल्याचे नगररचनाकार सोमनाथ केकाण यांनी ‘आजची नवी मुंबई’शी बोलताना सांगितले.
डिसेंबर 2017 साली नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त एन.रामास्वामी यांनी महापालिकेचा विकास आराखडा बनवण्याचा इरादा जाहीर केला होता. दरम्यानच्या काळात कोव्हिड संक्रमणामुळे दिड वर्षाचा कालावधी वाया गेल्यामुळे प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यास पालिकेला वेळ लागल्याचे केकाण यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची गरज पाहुन 564 भुखंडांवर आरक्षण प्रस्तावित केले होते. हा वाद शासनाच्या नगरविकास विभागाकडे गेल्यानंतर सिडकोने पालिकेला 500 चौ.मी क्षेत्रफळावरील भुखंडावर आरक्षण टाकण्यास मनाई केली होती. तर 12 भूखंडावरील आरक्षण वगळण्याचे आदेश पालिकेला दिले होते. आ. गणेश नाईक यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठवल्यावर हे मनाई आदेशाला 3 जानेवारी 2021 रोजी शासनाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या प्रारुप विकास आराखड्यात पालिकेने मुक्तहस्ते आरक्षणे टाकल्याची चर्चा आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज पाहून पालिकेने सिडकोकडे 1543 भुखंडांची मागणी केली असता त्यांना 619 भूखंड हस्तांतरीत केले असून उर्वरित 924 भूखंडांसाठी पालिकेचा मालमत्ता विभाग प्रयत्नशील आहे. पालिकेने सामाजिक सेवा सुविधांचे भूखंड आरक्षित करताना जेएनएनआरयूएम व क्रिसील या संस्थांचा रिपोर्ट विचारात घेतला असून 2028 साली शहराची लोकसंख्या 28 लक्ष होणार असल्याचे या आराखड्यात नमुद केले आहे. शहरामध्ये 67327 झोपडपट्ट्या असून त्यामध्ये 2 लाख 8 हजार लोक राहत असल्याचे नमुद केले आहे. या प्रारुप विकास आराखड्यात ऐरोली-कटई हा पाच कि.मी. रस्ता, विक्रोळी-घणसोली 2.93 कि.मी रस्त्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज बघुन सीबीडी -बेलापुर-वाशी व्हाया ठाणे अशा सागरी किनारा मार्गाचे नियोजन विकास आराखड्यात केले आहे. या विकास आराखड्यात मेट्रो आणि मोनो या दोन्ही सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मानखुर्द-खारघर 7.97 कि.मी, वाशी-ऐरोली 9.96 कि.मी, विक्रोळी शिळफाटा 5.40 ुकि.मी, दिघा-नवी मुंबई एअरपोर्ट 20.85 कि.मी. या मेट्रो मार्गांचेही नियोजन या आराखड्यात आहे. ही कामे एमएमआरडीए मार्फत करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
याबाबतची अधिसूचना पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली असून 60 दिवसांच्या आत नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हरकती प्राप्त झाल्यानंतरच सदर विकास आराखड्यात योग्य ते बदल करुन अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल. गेली 30 वर्ष प्रलंबित असलेला नवी मुंबई पालिकेच्या विकास आराखड्याची कवाडे अखेर उघडी झाल्याने सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या आतापर्यंतच्या कारभारावर व्यक्त होण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे.
पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. 2028 पर्यंतची पालिका क्षेत्राची लोकसंख्या विचारात घेऊन हा विकास आराखडा शासनाच्या परवानगीने एमआरटीपी कायद्याअंतर्गत नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी प्रसिध्द केला आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचना व हरकतींचा विचार करून आवश्यक ते फेरबदल करून सदर विकास आराखडा शासनाच्या मंजूरीस पाठविण्यात येईल. - सोमनाथ केकाण, नगररचनाकार, न.मुं.म.पा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे