Breaking News
महापालिका अधिकार्यांनी 4 कोटींचे काम नेले 7.37 कोटींवर
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रात निर्माण होणार्या काँक्रिट आणि डेब्रिजची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी क्षेपणभुमीत प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प उभारताना ठेकेदार आणि अधिकारी यांनी पालिकेला कोट्यावधींचा चुना लावल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. याबाबत आयुक्त राजेश नार्वेकर कोणती भुमिका घेतात याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
2019 मध्ये पालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुरस्कार मिळण्यासाठी तुर्भे येथील क्षेपणभुमीत नवी मुंबईत निर्माण होणार्या काँक्रिट व डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याची निविदा प्रक्रिया राबविली. यासाठी अंदाजपत्रक बनवताना सीडीई एशिया लि. या कंपनीने 10-20 टीपीएच क्षमतेच्या प्रक्रिया प्रकल्पासाठी 3.90 कोटी रुपये मुळ किमंत अधिक 18 टक्के वस्तू व सेवा कर आणि 14 लाख वाहतुक खर्च असा दर दिला होता. काँक्रिट व डेब्रिजवर पुर्ण प्रक्रिया करुन खडी व रेती बनवण्याच्या तंत्रज्ञानाचा समावेश कंपनीने दिलेल्या कोटेशनमध्ये असताना पालिका अधिकार्यांनी डेब्रिज व काँक्रिटवर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त 14.50 लाखांच्या क्रशिंग प्लान्टचा खर्च अंदाजपत्रकात जोडला. या अंदाजपत्रकात दोन कंटेनर केबिनची किंमत 30 लाख रुपये धरण्यात आली आहे.
हे काम महापालिकेने प्रविण एंटरप्रायझेस या कंपनीला 7.37 कोटी रुपयांना दिले असून त्यामध्ये वेगळा 12 टक्के जीएसटी देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराला पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी 525 रुपये प्रति टन खर्च मंजुर करण्यात आला आहे. माहिती अधिकारात संबंधित कामाची प्लान्ट खरेदीची बिले मागविली असता ती मे. प्रविण एंटरप्रायझेस यांच्या नावाने नसून सदर बिले एसजेएमए इंजिनिअरींग सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या नावाने असल्याचे आढळले आहे. या संपुर्ण प्लान्ट खरेदीच्या बिलांची एकत्रित रक्कम 2 कोटी 84 लाख रुपये असून ती मुळ अंदाजपत्रकातील रक्कमेपेक्षा 1 कोटी 89 लाखांनी कमी आहे. सदर अंदाजपत्रकात 18 टक्के जीएसटीसह असताना पालिकेने ठेकेदाराला अतिरिक्त 12 टक्के जीएसटी कार्यादेशासोबत दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकेने ठेकेदाराला 86 लाख 34 हजार रुपये जीएसटीपोटी अतिरिक्त अदा केल्याचे दिसत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंदाजपत्रकात नमुद केलेले कंटेनर केबीनची किमंत प्रत्येकी 15 लाख रुपये घेण्यात आली असून बाजारात सदर कंटेनर केबीन 1 ते 1.50 लाख रुपयांना उपलब्ध आहेत. या कंटेनर खरेदीत पालिकेला 27 लाखांचा चुना अधिकार्यांनी लावल्याचे स्पष्ट दिसत आहे.
निविदा प्रक्रियाही पारदर्शकपणे न राबविल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. ज्या सीडीई एशिया लि. कंपनीकडून पालिकेने अंदाजपत्रक बनविण्यासाठी दर घेतले त्याच कंपनीबरोबर जेएमए इंजिनिअरींग सर्व्हिसेस या कंपनीने निविदा भरताना भागिदारी करार केला आहे. एसजेएमए इंजिनिअरींग सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीच्या नावाने प्रविण एंटरप्रायझेस यांनी सदर मशिनरी खरेदी केली आहे त्या कंपनीचा पत्ता व जेएमए इंजिनिअरींग सर्व्हिसेस या कंपनीचा पत्ता व फोन नंबर एकच आहेत. त्यामुळे सदर निविदा प्रक्रियेत स्पर्धा न होता ती संबंधित ठेकेदारांनी एकत्रितपणे भरल्याचे दिसत आहे. याबाबत पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना विस्तृत तक्रार करण्यात आली असून याकामाचे विशेष लेखापरिक्षण हाती घेण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी केली आहे. पालिका आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने ही निविदा प्रक्रिया राबविली आहे. ज्या कंपनीकडून दरपत्रक घेण्यात आले त्याचकंपनीच्या भागीदाराने हे काम पुर्णत्वास नेल्याचे उपलब्ध कागदपत्रावरुन दिसत आहे. ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे त्याने हे काम केेले नसल्याचे दिसत आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याने या कामात पालिकेला कोट्यावधींचा चुना लागला आहे. पालिका आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेतात यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
छायाचित्रात नमुद केलेल्या प्रत्येक कंटेनर केबीनची किमंत प्रत्येकी 15 लाख रुपये घेण्यात आली असून बाजारात सदर कंटेनर केबीन 1 ते 1.50 लाख रुपयांना उपलब्ध आहेत. या कंटेनर खरेदीत पालिकेला 27 लाखांचा चुना अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने लावल्याचे स्पष्ट दिसत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे