पालिकेचे तीन हजार कोटींचे लक्ष्य हुकले
- by संजयकुमार सुर्वे
- Jan 13, 2023
- 870
2021-22 आर्थिक वर्षात 2946 कोटींचा खर्च
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात 2946 कोटींच्या खर्चाचा जादूई आकडा गाठला आहे. 50 कोटींनी 3000 कोटींच्या खर्चाचे लक्ष्य थोडक्यात हुकल्याने अधिकारीवर्गात रुखरुख लागली आहे तर कर्मचारी वर्ग मात्र भविष्यात पगाराला पैसे राहणार की नाही याबाबत चिंता व्यक्त करत आहे. तसेच पालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा खर्च एका आर्थिक वर्षात प्रशासकीय काळात झाल्याने नवी मुंबईकरांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी सन 2021-22 करिता 4825 कोटी रुपयांचा 270 कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यापैकी पालिकेने यावर्षी 2557 कोटी रुपयांची विक्रमी वसूली केली असून 2946 कोटी रुपयांच्या खर्चाचा जादूई आकडा गाठला आहे. यावेळी कोरोना संक्रमणाच्या काळात साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत व्यापक जनहितार्थ मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागाने खर्च केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कोव्हिड सेंटर उभारणे, विलगीकरण कक्ष उभारणे, पीपीटी किट, औषधांची खरेदी, ऑक्सिजन सिंलेंडर खरेदी, रुग्णांना जेवण यांचा समावेश आहे. सर्वात जास्त खर्च शहर अभियंता विभागाने केला असून तो 1128 कोटी रुपयांचा आहे. कर परताव्यापोटी पालिकेला 110 कोटी रुपये शासनास अदा करावे लागले आहेत. प्रशासकीय खर्च 567 कोटी रुपयांचा असून स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व क्षेपणभुमी अंतर्गत 285 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. समाज विकास कामांवर 35 कोटी, परिवहन विभागाने 203 कोटी तर शिक्षण विभागाने 58 कोटी रुपयांचा खर्च या आर्थिक वर्षात केला आहे.
यावेळी पालिकेला मालमत्ता करापोटी 536 कोटी, जीएसटी अनुदानापोटी 1418 कोटी, शासकीय अनुदान म्हणून 156 कोटी, पाणीविक्रितून 96 कोटी तर नगररचना विभागातून 57 कोटी, शहरात रस्ते खोदकाम परवानगीतून 21 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात पालिकेला 2557 कोटी रुपयांचे उत्पन्न जरी मिळाले असले तरी 2946 कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. या दोघांमधील तफावत सूमारे 400 कोटींची असल्याने उत्पन्नापेक्षा जास्त खर्च पालिकेने केल्याचे दिसत आहे. कोव्हिड संक्रमणामुळे पालिकेच्या खर्चात वाढ झाल्याचे लेखाविभागाकडून सांगण्यात आले आहे.
पालिकेने चालु आर्थिक वर्षात 350 कोटी रुपये खर्च करुन महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शन येथे उड्डाणपुल बांधणे, 500 कोटी रुपये खर्च करुन मोरबे धरणातील पाण्यावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे तसेच घणसोली ते ऐरोली पामबीच मार्ग जोडण्यासाठी 450 कोटी रुपयांचा उड्डाणपुल बांधणे, 150 कोटींचे सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करणे यासारखे प्रकल्प निविदा प्रक्रियेत असल्याने भविष्यात फार मोठा निधी पालिकेला लागणार आहे. त्यामुळे अनावश्यक कामांना लगाम घालणे गरजेचे असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालिकेत लोकप्रतिनिधींचे शासन असताना सरासरी 1800 कोटी रुपयांचा खर्च पालिकेकडून होत होता. परंतु प्रशासकीय काळात या खर्चाचा आकडा 3000 कोटींच्या जवळ गेल्याने कर्मचारी वर्गात चलबिचल सुरु झाली आहे. याउलट 3000 कोटी रुपयांचा खर्चाचा आकडा थोडक्याच हुकल्याने अधिकारी वर्गाला मोठी रुखरुख लागली असून आगामी आर्थिक वर्षात हा आकडा गाठण्याची मनिषा त्यांची आहे.
- गेले साहित्य कुणीकडे?
कोरोना संक्रमण काळात पालिकेने कोट्यवधींचे हजारो बेड, गाद्या, वातानुकूलित यंत्रे, पंखे, व्हेंटीलेटर्स, गिझर खरेदी केले. आज हे साहित्य कुठे आहे हा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे