वसाहत सेवा शुल्क ऑनलाईन

नवी मुंबई ः सिडकोच्या वसाहत विभागांशी संबंधित विविध सेवा अधिक चांगल्या प्रकारे, कार्यक्षम व पारदर्शकरित्या देता याव्यात या उद्देशाने नागरिकांसाठी या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यानंतर आता त्या सेवांसाठी करावा लागणारा रक्कमेचा भरणादेखील ऑनलाईन माध्यमातून करता येणार आहे. 

कोपास प्रणालीच्या बांधकाम परवानासंबंधी शुल्क ऑनलाईन भरण्याच्या सुविधेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वसाहत विभागांच्या हस्तांतरण, तारण ना हरकत प्रमाणपत्र, मुदतवाढ, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक, तात्पुरत्या परवानग्या इ. साठीचे शुल्क देखील ऑनलाईन भरता यावे अशी सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर सुविधा सुरू करण्यात आली होती. सिडकोच्या संकेतस्थळावरून नागरी सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर नागरिकांना आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून एनइएफटी, आरटीजीएस व आयएमपीएसद्वारे ऑनलाईन शुल्क अदा करण्याचे पर्याय उपलब्ध असतील. सदर शुल्काचा भरणा केल्यानंतर नागरिकांना एसएमएसद्वारे त्याबद्दल कळवण्यात येईल. त्यासाठी नागरिकांनी त्यांचा योग्य मोबाईल क्रमांक पुरवणे आवश्यक आहे. शुल्काचा भरणा केल्यानंतर त्याची पावती ई-मेल/जतन (सेव्ह) करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शुल्काचा भरणा केल्यानंतर सिडकोच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सीएफसी टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रिंट/व्ह्यू ऑप्शनच्या माध्यमातून नागरिकांना शुल्क भरणा केल्याची सिडकोची पावती प्राप्त करता येणार आहे. ऑनलाईन शुल्क भरणा प्रक्रियेमुळे अर्जदारांचा बँकेत वाया जाणारा वेळ, डिमांड ड्राफ्टसाठी भरावे लागणारे शुल्क आणि सिडको कार्यालयात येण्या-जाण्याचा त्रास, या सर्व गोष्टी टळणार आहेत. सिडकोतर्फे आर्थिक व्यवहार जलदगतीने होऊन वसाहत संबंधी सेवा अधिक तत्परतेने पुरवता याव्यात यासाठी इंडसइंड बँकेशी सहकार्य करून सदर सुविधांचा पेमेन्ट गेटवे सॅप प्रणालीशी जोडण्यात आला आहे.