Breaking News
अश्विन मुद्गल अध्यक्ष असलेल्या निविदा मुल्यमापन समितीची भुमिका संशयास्पद
नवी मुंबई ः पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत बांधण्यात येणाऱ्या 67 हजार घरांच्या विक्रिसाठी 700 कोटी रुपये खर्च करुन नेमण्यात आलेल्या दलाला प्रकरणी अनियमितता झाल्याची कागदपत्रे आजची नवी मुंबईच्या हाती लागली आहेत. सिडकोने मागवलेल्या स्वारस्य देकारातील अपात्र निविदाकाराला पात्र करण्यासाठी तत्कालीन उप व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल अध्यक्ष असलेल्या मुल्यमापन समितीने पात्रता नियमांमध्ये बदल केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. याबाबत शासन कोणती भुमिका घेते याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या ब्रँडिंगसाठी व विक्रिसाठी सल्लागार व दलाल नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेअंतर्गत सिडकोने 28 ऑक्टोबर 2020 रोजी ईच्छुक निविदाकारांकडून स्वारस्य देकार मागवले होते. या स्वारस्य देकारात 12.50 कोटी रुपयांचे खेळते भांडवल, 15 कोटी रुपयांचे नेटवर्थ व 50 कोटी रुपयांची मागिल 3 वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल असणे बंधनकारक होते. यावेळी 9 निविदा सिडकोस प्राप्त झाल्या. त्यामध्ये मे.गार्डियन रियल इस्टेट ॲडवायझरी एलएलपी, मे. एक्सनाडू रियालिटी प्रा. लि., मे. स्वेअर यार्ड्स कंन्सल्टींग प्रा.लि. , मे. एस.एम.सी रिअल इस्टेट ॲडवायझर प्रा.लि., मे. नाईट फ्रँक इंडिया प्रा.लि., मे. ॲनॅरॉक, मे. क्विकर रियालिटी लि., मे. थॉटस्ट्रेन डिझाइन प्रा.लि. , मे. हावरे व्हेंन्चर प्रा.लि. या कंपन्यांनी सदर निविदेमध्ये स्वारस्य दाखवले होते.
मुल्यमापन समितीने 9 निविदाकारांपैकी एकच निविदाकार पात्र ठरल्याचा निष्कर्ष काढला आणि निविदा अटी शिथील करण्याची शिफारस केली. या मुल्यमापन समितीचे अध्यक्ष उप व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल असून सिडकोचे मुख्य लेखा अधिकारी चंद्रशेखर बिवलकर, रविंद्रकुमार मानकर- चीफ प्लॅनर नवी मुंबई, फैयाज खान- महाव्यवस्थापक व वरिष्ठ अर्थशास्त्री दत्तात्रय साबळे सदस्य होते. या समितीने सादर केलेल्या मुल्यमापनानुसार 2 स्पर्धक पात्र होत असताना एकच स्पर्धक पात्र ठरला असा अभिप्राय का दिला याचा उलगडा होत नाही. वास्तविक पाहता, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये भाग घेणारे व त्यात पात्र ठरणारे स्पर्धकांना पुढील निविदा प्रक्रियेत भाग घेता येतो. परंतु, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रक्रिया पार पडल्यानंतर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल सादर करणारे स्पर्धक मे. थॉटस्ट्रेन डिझाइन प्रा.लि. वगळून भलतेच असल्याने ही निविदा प्रक्रिया सदोष असल्याचे बोलले जात आहे.
या 9 स्पर्धक निविदाकारांमध्ये 3 स्पर्धकांचे खेळते भांडवल आणि नेटवर्थ नकारात्मक असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्याचबरोबर 3 स्पर्धक हे वरील कोणत्याही अटींची पुर्तता करत नसल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. 1 निविदाकाराचे सरासरी नफा 50 कोटींपेक्षा 34 लाखाने कमी असल्याने त्यास अपात्र करण्यात आले. अशाप्रकारे 9 निविदाकारांपैकी 7 जण अपात्र असून 2 पात्र असताना नस्तीवर शेरा मात्र एकच पात्र असल्याचा मारण्यात आला. या अपात्र स्पर्धकांमध्ये आता ज्या स्पर्धकाला काम देण्यात आले म्हणजेच मे. थॉटस्ट्रेन डिझाइन प्रा.लि. याचा समावेश होता.
मुल्यमापन समितीच्या शिफारसीवरुन नंतर तांत्रिक पात्रता अटींमध्ये बदल करण्यात येऊन वैयक्तिक स्पर्धकास वार्षिक उलाढाल 15 कोटींची तर जेव्ही मधील स्पर्धकास 25 कोटींची अट ठेवण्यात आली. तसेच 25 कोटींच्या उलाढालीसाठी मुळ कंपनीच्या सह कंपनीची उलाढाल ग्राह्य धरण्याची अट टाकण्यात आली. उलाढालीची अट कमी करुनही स्वारस्य देकारात पात्र ठरलेल्या तीनही निविदाकारांनी यात भाग घेतला नाही की त्यांना भाग घेऊ दिला नाही याबाबत उलटसूटल चर्चा सिडकोत आहे.
मुल्यमापन समितीने बदललेल्या निविदा अटीतील शर्तीनुसार नव्याने स्वारस्य देकार का मागवण्यात आले नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याचबरोबर स्वारस्य देकारात पात्र ठरलेला निविदाकार नंतरच्या निविदा प्रक्रियेत कसा भाग घेवू शकतो याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मुल्यमापन समितीचा निर्णय संशयास्पद असून अपात्र ठेकेदाराला पात्र करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे