कुष्ठरुग्ण शोध अभियानासाठी 181 पथके
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 31, 2025
- 350
नवी मुंबई ः कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 30 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान’ ही मोहिम नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहिम राबविण्यात येणार असून 181 पथकांच्या माध्यमातून 98,542 घरातील 3,37,522 लोकसंख्येला भेटी देऊन नागरीकांची तपासणी करून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक पथक दररोज 30 घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत होईल अशा प्रकारे पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरूष कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महीला कर्मचाऱ्यामार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाकरीता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे, इ. लक्षणे विचारुन तपासणी होणार आहे. यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैदयकिय अधिकारी यांचेकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यक्षेत्राची निवड केली असून यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इ. भागाचा समावेश केला आहे. त्यानुसार 3,37,522 लोकसंख्येमध्ये 181 पथकांद्वारे मोहिम कालावधीत भेटी देण्यात येणार आहेत. या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहूविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहूविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दीष्ठ साध्य करण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वत:ची कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai