Breaking News
कंपन्यांचा प्रस्ताव, दर, क्षमता, ग्राहकांची यादी देण्यास सिडकोचा नकार
नवी मुंबई ः नैना प्रकल्पात दोन हजार कोटींचे पावसाळी गटार बांधण्यासाठी सल्लागार हितेन सेठी आणि असोसिएट्स यांनी प्रिकास्ट गटार बांधण्याचा प्रस्ताव सिडकोला दिला होता. या अनुषंगाने प्रिकास्ट गटार बनवून ते पुरवण्यासाठी सिडकोच्या पुरवठादार नेमण्याच्या विभागाने राबवलेली प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे समोर आले आहे. या निवडप्रक्रियेबाबत माहिती मागितली असता ती देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सिडकोने नैना क्षेत्रात सूमारे 6 हजार कोटींची विकासकामे हाती घेतली आहेत. या कामांमध्ये रस्ता बांधणे, पावसाळी गटारे बांधणे आणि उड्डाणपुल बांधणे ही कामे टिपीएस क्र. 1 ते 12 या शासनाने मंजुर केलेल्या विकासयोजनेत करण्यात येणार आहेत. वरील कामांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निविदा प्रक्रिया पुर्ण करुन 10 ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. या सर्व कामांमध्ये 50 टक्के काम हे प्रीकास्ट तंत्रज्ञानाने पावसाळी गटारे बांधण्याचे असून ही गटारे अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे फॅक्टरीमध्ये तयार करुन ती प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या प्रिकास्ट गटारांचा दोष दुरुस्ती कालावधी काम संपल्यानंतर 10 वर्षांचा ठेवण्यात आला आहे. या कामाचे अंदाजपत्रक बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या सीपीडब्ल्यूडी या विभागाची दरसूची वापरण्यात आली आहे. सिडकोने प्रिकास्ट पावसाळी गटारे बनवून पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची यादी निश्चित केली असून तळेगाव एमआयडीसी पुणे येथील मे. सिद्धीविनायक प्रिकास्ट पाईप्स प्रा.लि., छत्रपती संभाजीनगर येथील मे. फुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., नाशिक येथील मे. सुपर सिमेंट आर्टिकल्स आणि अहमदाबाद येथील फुजी सिल्वरटेक काँक्रिट प्रा.लि. या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून सदर प्रिकास्ट गटर विकत घेण्याची अट निविदेत असल्याने सदर पुरवठादारांनी कंत्राटदारांना चढे दर दिल्याने निविदा 40 टक्के वाढीव दराने भरण्यात आल्याची चर्चा त्यावेळी सिडकोत होती. सदर चारही कंपन्यांच्या निवड प्रक्रियेबाबत सिडकोच्या पुरवठादार विभागाकडे माहिती मागितली असता त्यांनी सदर माहिती देण्यास नकार दिला. या चारही कंपन्यांनी सिडकोला दिलेला प्रस्ताव, दिलेले दर त्यांची उत्पादन क्षमता तसेच त्यांनी यापुव अशाचप्रकारच्या केलेल्या कामांचा अनुभव आणि त्यांनी सादर केलेल्या ग्राहकांची यादी मागितली होती. त्यांनी प्रिकास्ट गटर पुरवठा केलेल्या ग्राहकांकडून सदर कंपन्यांच्या उत्पादनाच्या दर्जाबाबत मागवलेला अहवाल सिडकोकडे मागितला असता असा कोणताही अहवाल दफ्तरी नसल्याचे त्यांनी माहिती अधिकारात कळवले.
एवढेच नाही तर सदर पुरवठादारांच्या उत्पादन करणाऱ्या प्लॅन्टवर सिडको अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीबाबतही उपलब्ध केलेल्या कागदपत्रांवरुन संदिग्धता निर्माण होत आहे. सिडको अधिकाऱ्यांनी प्लॅन्टंना दिलेली भेट, सादर केलेला अहवाल तसेच काँक्रिटचा तपासणी अहवाल यांच्या तारखांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. सिडको अधिकाऱ्यांनी सदर कंपन्यांच्या प्लॅन्टंना दिलेल्या भेटीसाठी वापरलेली गाडी, प्रवासासाठी काढलेले तिकीट याबाबतही कोणतीही माहिती सिडकोच्या दफ्तरी नसल्याचे अर्जदार संजयकुमार सुर्वे यांना पुरवठादार निवड विभागाने कळवले आहे. त्यामुळे सिडकोच्या याविभागाने 2 हजार कोटींहून अधिक प्रिकास्ट गटर पुरवणाऱ्या पुरवठादार कंपन्यांची निवड पारदर्शकपणे केली असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसत नसल्याचे सुर्वे यांचे म्हणणे आहे. त्यातच एक पुरवठादार अहमदाबादमधील असल्याने सिडकोच्या पुरवठादार निवड विभागावर खास दबाव असल्याची चर्चा सध्या सिडकोत आहे.
पुरवठादार कंपन्यांनी यापुव प्रिकास्ट गटर पुरवलेल्या ग्राहकांकडून सदर कंपन्यांच्या उत्पादनाच्या दर्जाबाबत अहवाल मागवला असता तर सिडकोला योग्य ती कंपनी या कामासाठी निवडणे सोयीचे झाले असते. परंतु, सिडकोने याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. फक्त पुरवठादार कंपनी निवडण्याचा फार्स करण्यात आल्याचे त्यांच्या निवड प्रक्रियेवरुन दिसून येत आहे. त्यांनी पुरवलेले कागदपत्रांमध्ये ताळमेळ नसून विशिष्ट कंपनीला लाभ व्हावा म्हणून हे कागदीघोडे सिडकोकडून नाचवण्यात आले. -संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे