माथाडी मेळाव्याकडे एकनाथ शिंदे यांची पाठ
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2025
- 67
पालिका निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता
नवी मुंबई : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईतील पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाश्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या माथाडी कामगार मेळाव्याला एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा पाठ दाखवली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या माथाडी कामगार नेते यांना भाषणातच हुंदके आवरता आले नाहीत. याचे भांडवल विरोधकांनी करुन माथाडी कामगारांना भावनिक साद दिल्याने त्याचे पडसाद आगामी पालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचे औचित्य साधून अजून अनेक माथाडी कामगार आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या उद्देशाने एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून 30 ऑक्टोबरला माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यापुर्वी माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी अनुपस्थिती दाखवली. परंतु, या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपस्थित राहिले. त्यामुळे माथाडी कामगारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधावा या भावनेतून नरेंद्र पाटील यांनी पुन्हा एकदा एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
नवी मुंबईत असलेल्या एपीएमसी मार्केटला पुनर्विकासाचे वेध लागल्याने आणि त्याची सुत्रे नगरविकास विभागाकडे असल्याने एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सध्या स्थानिक माथाडी कामगार नेत्यांकडून होत आहे. एकनाथ शिंदे या मेळाव्याला यावेत म्हणून नरेंद्र पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. हा मेळावा आधी बुधवारी (29 ऑक्टोबर) निश्चित करण्यात आला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (30 ऑक्टोबर) या मेळाव्याचे आयोजन निश्चित करून सर्वांना निमंत्रित करण्यात आले. गुरुवारी सकाळी आंबेडकर चळवळीतले दिवंगत नेते रा.सु.गवई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे अमरावतीला जाणार असल्याने सदर मेळावा दुपारी 4 च्या नंतर घेण्याचे ठरले परंतु, नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीला शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक असल्याचे कारण सांगत एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावरून थेट सह्याद्री अतिथीगृह गाठले. या दरम्यान, संध्याकाळी 5 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वाट पाहत बसलेल्या माथाडी कामगारांचा मात्र संयम सुटत चालला होता. अखेर, एकनाथ शिंदे यांना उशीर होणार हे कळताच महिला कामगारांनी आपले घर गाठण्यासाठी तिथून निघण्याचा निर्णय घेतला.
माथाडी कामगारांना थोपवण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी भावनिक साद घातली. या भाषणादरम्यान नरेंद्र पाटलांना आपल्या भावना आवरणे शक्य झाले नाही. बोलताना अधूनमधून त्यांचे हुंदके उपस्थितांच्या कानावर पडत होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपला शब्द पाळतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ते येतील अशी आशा बाळगून मी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून राहीन असे म्हणत आपला निर्धार व्यक्त केला. शेवटी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत कार्यक्रमाचा समारोप केला. परंतु, शिंदे यांनी दुसऱ्यांदा माथाडींच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने नाराज झालेल्या कामगारांना चिथवण्याचे काम विरोधकांनी सुरु केल्याने त्याचा फटका पालिका निवडणुकीत शिंदेसेनेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे माथाडी कामगारांची नाराजी कशी दूर करतात याकडे शिंदेसेनेचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai