नवी मुंबईत 11 कोरोनाग्रस्त

नवी मुंबई ः शहरात मंगळवारी करोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 11 वर गेली. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

वाशी येथे मंगळवारी करोनाचा एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण वाशीतील मशिदीमध्ये फिलिपिन्स नागरिकाच्या संपर्कात आला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या 52 जणांचे सध्या घरी विलगीकरण करण्यात आले आहे. दुसरा रुग्ण नेरूळ येथे आढळून आला. हा रुग्ण मुंबईमध्ये एका करोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. तिसरा रुग्णही नेरूळ सेक्टर 28मध्ये आढळून आला आहे. नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी नवी मुंबईत नव्याने आढळून आलेल्या दोन्ही रुग्णांना यापूर्वीच विलग करण्यात आले होते. त्यांच्या घरातील सदस्यांची आणि ते ज्या नातेवाईकांना भेटले त्यांचीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांचे आता घरातच विलगीकरण करण्यात आले आहे, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

पनवेलमध्ये आणखी एक रुग्ण 

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे.पनवेल मधील खारघर शहरातील हा रुग्ण आहे.दुबई प्रवासाचा इतिहास असलेला हा व्यक्ती होम कोरंटाईन मध्ये होता. मंगळवारी या व्यक्तीचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पनवेल मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या तीन झाली असून एका रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.पनवेल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन झाली आहे. अद्यापही शेकडो नागरिक पनवेल मध्ये होम कोरंटाईन मध्ये आहेत.