15 दिवसात 2247 वाहनांवर कारवाई

उरण ः वाहतुक शाखेने नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर 15 दिवसात 2247 जणांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती वाहतुक उरण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली. रस्त्यावर अनेक अपघात हे नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहन चालकांमुळे झाले आहेत.

उरण शहरातील वैष्णवी हॉटेल ते राजपाल नाका ,उरण चारफाटा ते राजपाल नाका ,कोट नाका ते राजपाल नाकापलीि; या ठिकाणी कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे,यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार निता डाऊर, पोलीस नाईक सिद्धादेन कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश घोडके व सिडको वार्डन आदी कारवाई करीत आहेत.

1 ते 15 जुलै दरम्यान उरण वाहतूक शाखेकडून उरण तालुक्यात एकूण 2247 जणांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुचाकी, चारचाकीचालकांवर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करणार्‍यावर, हेल्मेट नसणे, विना लायसन्स ट्रिपल सीट नंबर प्लेट अशा एकूण 1017 वाहनांवर कारवाई केली आहे. अन्य कारणांनी चारचाकी सहाचाकी आणि अवजड 1035 वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. ओव्हर सीट लायसन्स अशा अन्य कारणांनी 950 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा एकूण 2247 वाहनांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती नलावडे यांनी दिली आहे.