Breaking News
शिवसेना-भाजप एकत्र येण्यास दिल्लीत जोरदार प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरु असून पवार यांनी मारलेल्या अपात्रतेची पाचर प्रमुख अडथळा ठरली आहे. नेतृत्वाची फूस असल्याशिवाय बंडखोरी करण्याची कुवत एकनाथ शिंदे यांच्यात नाही. पण बंडखोरीनंतर पवारांनी सोळा आमदारांवर करावयास लावलेल्या अपात्रतेच्या कारवाईने सेना व भाजपात दिलजमाईची शक्यता मावळली आहे. पवारांच्या या चालीने उद्धव यांना पवारांसोबत तर शिंदे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने दोघेही त्यातून कसा मार्ग काढतात त्याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देशाच्या राजकारणात शरद पवार हे चाणक्य म्हणून ओळखले जातात. पवारांच्या तिरक्या चालीचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही किंबहुना जेव्हा सावजाचा बळी जातो तेव्हाच त्यांच्या चालीचा अंदाज विरोधकांना येतो. 2019 मध्ये पवारांनी सकाळी 7.30 वाजता भाजपसोबत सरकार स्थापून पवारांचे राजकीय पर्व संपले म्हणून बोंबलणाऱ्या फडणवीसांना अशाच प्रकारे कात्रजचा घाट दाखवला. आता तोच कात्रजचा घाट त्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जात असताना यापूर्वीही त्यांनी 2014 मध्ये अशाच प्रकारची पाचर सेना-भाजप युतीत मतदानाच्या वेळी गैरहजर राहून मारली. त्यावेळी सेना-भाजपमधील मतभेद एवढे विकोपाला गेले कि सेनेने शेवटी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले. काही कालावधीनंतर सेनेला स्वतःहून फडणवीस सरकारमध्ये सामील व्हावे लागले आणि फडणवीस जे काही देतील त्यावर समाधान मानून पुढील पाच वर्ष काढावी लागली.
याहीवेळी पवारांनी अशीच खेळी केल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या सत्ता वाटपावरून बेबनाव झाला आणि यावेळी त्यांनी उद्धव यांना पाठिंबा देऊन फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरुंग लावले. ते भंगलेले फडणवीसांचे स्वप्न आज सत्ता येऊनही पूर्ण होऊ शकले नाही. यातच पवारांच्या खेळीचा अंदाज वेगळाच असल्याचे दिसते. दोन्ही पक्षांच्या कार्यपद्धतीतच वैचारिक मतभिन्नता असल्याने आज ना उद्या उद्धव पुन्हा भाजपाकडे वळतील अशी खात्री पवारांना नक्कीच होती. त्याचमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव यांच्या गळ्यात घातली आणि महत्वाची खाती आपल्याकडे ठेवून अडीच वर्ष राज्य चालवले. खंरतर उद्धव यांना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते पण पवारांचा आदेश ते अवहेरू शकले नाही.
महाविकास आघाडी सरकारमधील 21 आमदारांच्या मागे प्रवर्तन निर्देशनालयाचा चौकशीचा ससेमिरा सुरु केला गेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही मेहुणे ईडीच्या रडारवर आहेत. ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब, यशवंत जाधव यांनाही लक्ष करण्यात आले. त्यांच्याही पाठीमागे चौकशीचा भुंगा गुणगुणू लागला. एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या माणसाला ईडीची नोटीस आल्यावर मात्र शिंदे यांनी कामगिरी फत्ते करण्याचा विडा उचलला. यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीची वेळ निवडण्यात आली. या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे 16 आमदारांसह सुरतला रवाना झाले. पवारांकडून ठाकरे यांना बंडखोरीच्या हालचालीबद्दल सूचितही करण्यात आले होते. पण उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीपूर्वी आणि बंडखोरी झाल्यानंतर सरकार वाचवण्यास परिश्रम केल्याचे कुठेच दिसत नाही. प्रत्येकवेळी ते बंडखोरांना समोर येऊन बोलण्याचे सांगत राहिले, जर महाविकास आघाडी नको असेल तर आपण तसा निर्णय घेऊ पण समोर येऊन सांगा असेच फेसबुक वरून आव्हान करत राहिले. त्या दरम्यान शरद पवारांनी उद्धव यांनी राजीनामा देऊ नये असे सांगितल्याने तिथे पहिली अडचण भाजपसह शिंदे यांची झाली.
बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे लगेच राजीनामा देतील आणि फडणवीस सरकार स्थापनेचा दावा करतील अशी अटकळ बांधून देव पाण्यात ठेवलेल्यांना पवारांच्या या खेळीने सत्ता स्थापनेस बराच काळ वाट पाहावी लागली. दरम्यानच्या काळात शिवसेनेतील एक-एक आमदार मंत्री शिंदे यांना मिळत राहिले आणि त्यांनी बहुमताचा आकडा जमावल्यावर राज्यपालांना पत्र दिले. पवारांच्या इच्छेवरून पक्षाच्या बैठकीस गैरहजर राहिलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची तक्रार उपसभापती झिरवळ यांच्याकडे दाखल करणे सेनेला भाग पडले आणि इथेच पवारांनी बाजी उलटवली. उद्धव यांनीही लढाईची सर्व सूत्रे त्यांच्या हाती असताना राजीनामा देऊन ती सर्व सूत्रे राज्यपालांच्या हाती देऊन काय साधले हा पण राजकीय अभ्यासाचा विषय ठरावा. दरम्यान शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ संजय राऊत ईडीच्या कारवाईत आत गेल्यावर त्यांची जागा घेण्यास सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत पाठवून अजून एक पाचर मारली. अंधारे यांच्या धुरंधर व तर्कसंगत आवेशपूर्ण भाषणांनी शिवसैनिकांत शिवतेज संचारलेच पण त्यांनी भाजपनेत्यांनाही आपल्या हजरजबाबी वक्तृत्वाने घायाळ केले आहे. पवारांची हि चाल कमालीची यशस्वी ठरली असून उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे-भाजपात एकाचवेळी चांगलीच लावून दिल्याने त्यांच्यातील कटुता वाढवण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत.
आज बंडखोरांना अपात्रतेपासून न्यायालयीन लढाईने जरी तात्पुरते संरक्षण मिळाले असले तरी अपात्रतेची कारवाई अटळ असल्याने शिंदेसह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांचा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. करायला गेले मारुती आणि झाला गणपती अशी काहीशी अवस्था शिंदेगटाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे आणि उद्धव यांनी एकत्र यावे असे सर्वांकडून प्रयत्न सुरु असले तरी आता उद्धव यांना माघार घेणे शक्य नाही. त्यांनी शिंदे गटाशी जुळवून घेतल्यास या बंडाला त्यांचीच फूस होती हे सांगायला काँग्रेस-राष्ट्रवादी मोकळे होतील आणि आजपर्यंत मिळवलेली सहानभूती एका झटक्यात उतरेल याची जाणीव ठाकरे यांना नक्कीच आहे. शिंदेनाही भाजपशिवाय पर्याय नाही आणि नाईलाजाने का होईना उद्धव यांनाही पवारांसोबत गेल्या शिवाय पर्याय नाही. त्यातच सुषमाताईच्या वक्तृत्वाने दोन्ही गटातील नेत्यांच्या डोळयासमोरील अंधार दिवसेंदिवस वाढत असल्याने इकडे आड अन् तिकडे विहिर अशी अवस्था शिवसेना ठाकरे व शिंदे गट शिवाय भाजपची झाली आहे. सेना-भाजपच्या दिलजमाईस पवारांची पाचर मोठी अडथळा ठरेल हे निश्चित.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे