Breaking News
पनवेल पालिका आयुक्तांचे आवाहन
पनवेल ः पनवेलमध्ये खासगी व सार्वजनिक लहान मोठ्या पन्नास हजारांहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. याच हजारो मूर्तींचे विसर्जन पनवेल पालिका क्षेत्रातील तलाव, नदीपात्रात केले जाते. शाडूंपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात असल्याने मूर्तीचे विघटन होत नाही. त्यामुळे विसर्जनानंतर जलाशयांचे चित्र विदारक असते. हे चित्र बदलायचे असेल तर रहिवाशांनी पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचा निर्धार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने जाहीर केलेल्या पंचसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी खारघ येथे केले.
गुरुवारी सायंकाळी खारघर येथील लिटल वर्ल्ड मॉलमधील बीएमएक्स चित्रपटगृहामध्ये पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी निर्मित केलेल्या ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' हा लघूपट व ‘बाप्पा मोरया रे' या गाण्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आयुक्त देशमुख बोलत होते. पालिकेने गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पंचसूत्री पालनाचे आवाहन केले आहे. यामध्ये गणेशाची मूर्ती शाडू मातीची असावी, सजावट पर्यावरणपूरक असून त्यामध्ये प्लास्टीक व थर्माकोलचा वापर करू नये, कृत्रिम तलावांमध्ये मूर्तीचे विसर्जन करावे किंवा मूर्ती पालिकेला दान करावी, डीजे वापरू नये असे आवाहन केले आहे. पालिका माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत पर्यावरण जागृतीचे विविध उपक्रम राबवित आहे. संगीत व चलचित्रातून समाज प्रबोधन हा त्याचाच एक भाग आहे. ब्रॅण्ड फ्रॉफीट ॲडव्हरटायझिंग या प्रोडक्शन कंपनीने ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' हा लघूपट आणि ‘बाप्पा मोरया रे' हे गाणे तयार केले. यामध्ये अभिनेता गश्मिर महाजन, अभिनेत्री कुंजिका काळविंट यांनी अभिनय केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai