कैद्यांना विशेष सवलत दिल्याने सात पोलीसांचे निलंबन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 31, 2023
- 465
वाधवान बंधूंना उपचाराच्या नावाखाली व्हिआयपी वागणुक
पनवेल : कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूकीप्रकरणी तळोजा येथील तुरुंगात न्यायालयीन बंदी असलेल्या कपील आणि धीरज वाधवान बंधूंना वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली व्हिआयपी वागणुक दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी एक पोलीस अधिकाऱ्यासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
वाधवान बंधूंवर 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तळोजा येथील मध्यवर्ती तुरुंगात मागील अनेक महिन्यांपासून न्यायालयीन बंदी म्हणून वाधवान बंधू आहेत. त्यांची प्रकृती वारंवार बिघडते आणि कारागृहातील डॉक्टर त्यांना मुंबईच्या सरकारी रुग्णालयात जाण्याची मुभा देतात. त्या सरकारी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांच्या भेटीनंतर पोलीस बंदोबस्तामध्ये काहीक्षण बंदींकडे कानाडोळा करण्यासाठी चिरीमीरी दिली जाते. 7 ऑगस्टला कपील वाधवान याला मुंबई येथील के. ई. एम आणि जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्याने रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची आणि सहकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने खासगी कारमध्ये बसून मोबाइल व लॅपटॉप हाताळल्याचे व काही कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचे तसेच कारमध्येच नातेवाईकांसह जेवण केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर दोन दिवसांनी 9 ऑगस्टला धीरज वाधवानलाही त्याच पद्धतीने तळोजा कारागृहामधून जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानेही कैदी पार्टीसमोर रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये नातेवाइकांची भेट घेऊन कागदपत्रे हाताळल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे वाधवान बंधूंच्या नातेवाईकांकडून कैदी पार्टीतील पोलिसांना नाश्ताही देण्यात आल्याचे आढळले आहे. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीसांवर निष्क्रीय पोलीस असल्याचा ठपका ठेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे. या बाबीची गंभीर दखल घेत नवी मुंबई पोलिस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांनी वाधवान बंधूंच्या कैदी पार्टीत असलेले पोलिस उपनिरीक्षक आशुतोष देशमुख, पोलिस हवालदार विशाल दखने, सागर देशमुख, प्राजक्त पाटील, रवींद्र देवरे, प्रदीप लोखंडे व माया बारवे या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
फसवणूकीचा छडा लागण्यास मदत होईल?
मागील अनेक महिन्यात वाधवान यांनी कोणाकोणाला कितीवेळा कारागृहातून पत्रे लिहिली, पत्र लिहील्यानंतरच त्यांना आजारपण कसे ओढावले. तुरुंगातील डॉक्टरांनी वाधवान बंधूंनी आजारपणाची तक्रार केल्यानंतर त्यांना लगेच सरकारी मुंबईच्या रुग्णालयात वारंवार कसे जाऊ दिले. याच तुरुंगातील डॉक्टरांनी इतर बंदींना या पद्धतीने मुंबईच्या सरकारी रुग्णालयात जाऊ दिले का? असे अनेक प्रश्न वाधवान बंधूंना पोलीसांनी केलेल्या मदतीच्या प्रकरणानंतर विचारले जात आहेत. 7 व 9 ऑगस्टला झालेल्या या खासगी बैठकांमध्ये वाधवान बंधू कोणाकोणाला भेटले, त्यांनी लॅपटॉपवर कोणती कामे केली, त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात कोणत्या महागड्या मोटारी आल्या, याचा शोध पोलीसांनी घेतल्यावर 34 हजार कोटी रुपयांच्या फसवणूकीचा छडा लागण्यास मदत होईल अशी चर्चा पोलीस दलात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai