राज्यातील निवडणुकांचे भवितव्य अधांतरी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 41
निवडणुका ठरल्याप्रमाणेच; अंतिम निकाल न्यायालयाचा
मुंबई ः राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली असूनही महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. 21 जानेवारीला तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून या अंतिम निकालाच्या अधीन 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींचे भवितव्य असेल असे त्यांनी सांगितल्याने राज्यातील निवडणुकांचे भवितव्य अधांतरी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेलंगणात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने, उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली. महाराष्ट्रातही मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने, निवडणुकांवर स्थगिती येणार का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्यातील निवडणुकीला स्थगिती दिली नसल्याने, ठरल्या वेळेत पार पडणार आहेत. 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहे.
राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील सुनावणी 21 जानेवारीला ठेवण्यात आली आहे. फक्त 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायत आहेत जिथे आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक आहे. जे मुद्दे निर्माण होऊ शकतात ते विचारात घेऊन जानेवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर प्रकरण सूचीबद्ध करावे असे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. दरम्यान, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार होऊ शकतात परंतु संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचेे निकाल या कार्यवाहीच्या अंतिम निकालाच्या अधीन असतील असे म्हटल्याने या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
- तेलंगणाला एक तर महाराष्ट्राला दुसरा न्याय
तेलंगणा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली. परंतु, हा न्यायाचा निकष महाराष्ट्र राज्याला का लावला नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तेलगंणात विरोधकांचे सरकार असल्याने तेलंगणाला एक तर महाराष्ट्राला दुसऱ्या न्यायाची फुटपट्टी लावत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. - निवडणुका रद्द झाल्यास जबाबदारी कोणाची?
राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. असे असताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती न देता निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासापेक्ष हिरवा कंदिल दिला आहे. परंतु, राज्यातील या 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली म्हणून रद्द झाल्यास होणाऱ्या खर्चाची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत काय काय सांगितलं?
- मनपा, जि.प आणि पं.समित्यांच्या निवडणुकांना विलंब नको.
- 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या
- आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाधीन
- कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही
- बांठिया आयोगाचा अहवाल आम्हीही वाचला नाही,पण सध्या त्यालाच आधार मानतायत
- मनपा,जि.परिषदा,पं.समित्यांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नको
निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिलेली माहिती
- 40 नगरपरिषद - 17 नगरपंचायतीत पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे.
- 2 तारखेला मतदान होणार आहे.
- जिल्हा परिषद आणि महानगरपालिका व्हायच्या आहेत.
- मतदार संघ पुनर्रचना, आरक्षण प्रभाग आणि मतदार यादी या तीन टप्पे पुर्ण झाले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai