ठाकरेबंधु एकत्र लढणार?
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 32
जागा वाटपावरुन रस्सीखेच; युतीवरुन खलबतं
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सहा महापालिकेच्या निवडणुका ठाकरे बंधु एकत्र लढणार असल्याचे बोलले जात असून जागा वाटपासाठी त्यांची रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवर जवळपास 1.30 तास चर्चा झाली. राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट राज्यातील सहा महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असून मुंबई महापालिकेसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसेच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे. परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे. (पान 7 वर)
ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असणार आहे.
एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतरही ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेण्याकरता प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळाचा नारा देऊनही मुंबईत शरद पवारांसोबत चूल मांडण्यासाठी उत्सुक आहे. या सगळ्यात मनसे सध्यातरी मविआपासून वेगळी असली तरी ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेला मविआत सामावून घेता येइल का? काँग्रेस वेगळी लढल्यास त्याचा ठाकरेंच्या युतीला फटका बसेल का? तसे झाल्यास काँग्रेसचे नेमके करायचे काय? या प्रश्नांवर दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच, मुंबईत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या समान प्राबल्यांच्या जागांवर काय करायचं याचीही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai