सहा महिन्यात मालमत्ता करापोटी 200 कोटींची भर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 21, 2023
- 623
उच्चतम थकबाकीदारांना पालिकेकडून जप्तीपूर्व नोटीसा
नवी मुंबई ः या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून ते 19 ऑक्टोबर पर्यंत 200 कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रक्कमेची करवसुली होण्याची सदर पहिलीच वेळ आहे.
गेल्या चार वर्षांपासून ते आजपर्यंत 475 कोटींची वसुली करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा 2 टक्क्यांची वाढ होत असल्याने दिवसेंदिवस मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. याशिवाय ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरल्यास शासकीय कर वगळता मालमत्ताधारकांना दोन टक्के सूट मिळत आहे.
मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरल्यास मालमत्तांधारकांना दोन टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या उच्चतम थकबाकीदारांना पनवेल महापालिकेच्या वतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत औद्योगिक 100 मालमत्तांना, निवासी 301 मालमत्तांना, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील 349 मालमत्ता अशा एकुण 750 थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कामासाठी खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही नोडमध्ये पनवेल महापालिकेची 8 पथके तैनात करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन मालमत्ता कराच्या वसुलीवर भर देत आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आता महापालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. महापालिकेने मालमत्ता कर न भरलेल्या औद्योगिक, निवासी, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावणी संबंधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी दोन अशी आठ पथके तयार केली आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai