Breaking News
साथरोग टाळण्यासाठी आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
पनवेल: महाराष्ट्र शासनाच्या व सहाय्यक संचालक आरोग्य विभाग उपसंचालकांच्या सुचनेप्रमाणे बुधवार हा दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी बुधवार हा दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
सध्या सर्वत्र डेंगू, मलेरिया सारख्या साथजन्य रोगाचे रूग्ण दिसून येत आहेत ;या पार्श्वभूमीवरती वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजराविषयी खबरदारी घेण्यासाठी जनजागृती विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. पावसाळ्यांनंतर विविध किटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशा वेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या,फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा. घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी, डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी जेणे करून डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहरीचे पाणी शुध्दीकरण करूनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षारसंजिवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी मनीप्लँट,वॉटरकूलर इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक दिवस बुधवारी पुर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा, अशा सूचना वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले, ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणेअसल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. हिवताप,डेंगू, मेंदूज्वर, चिकनगुनिया,मलेरिया असे साथीचे रूग्ण आपल्या आसपास आढल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा रूग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागाच्याने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai