Breaking News
पनवेल ः सिडकोच्या नैना प्राधिकरणाला कायमस्वरूपी हटवण्यासाठी नैनाबाधित शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. नैना विरोधातील ही आरपारची लढाई असून शिरढोण येथून पनवेलच्या शेतकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘नैना हटाव शेतकरी बचाव' अशा घोषणा देत काढलेल्या रॅलीतून तुरमाळे गावात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र घोषित केले आहे. या निर्णयाने आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत बांधकामे करण्यात प्रकल्पग्रस्तांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे यूडीसीपीआर कायद्याप्रमाणे या परिसराचा विकास करा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. याच अनुषंगाने सोमवारी (ता.4) फडके नाट्यगृहात झालेल्या बैठकीत राजकीय पक्षांनी बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात दर आठवड्याला प्रत्येक गावातील सदस्यांची भर पडणार आहे. तसेच गावस्तरावर घेतल्या जाणाऱ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे. तसेच या माध्यमातून 95 गावे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नैनाविरोधातील ही आरपारची लढाई असून एकतर हा प्रकल्प रद्द होईल किंवा उपोषणकर्त्यांची अंत्ययात्रा निघेल, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.
‘नैना'विरोधी प्रकल्पग्रस्त संघटनांच्या विविध नेत्यांनी खासदार अनंत गीते, अरविंद सावंत, विनायक राऊत यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. पनवेलसह, पेण, उरण तालुक्यातील ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. सध्या गावस्तरावर घेतल्या जाणाऱ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंब्याबरोबर सहभागी होणार असल्याचे सांगितले. ‘नैना' विरोधातील हा आमचा अंतिम लढा आहे. शेतकरी उद्ध्वस्त करणारी नैना आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. - अनिल ढवळे, उपोषणकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai