Breaking News
पनवेल : पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी पनवेलमध्ये जोरदार सुरू आहे. आतापर्यंत आठ हजार 396 पथविक्रेत्यांना 10 कोटी 50 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज विविध बँकेतून वितरित झाल्याची माहिती सोमवारी पालिकेत झालेल्या बैठकीत समोर आली.
पनवेल महापालिका प्रशासन आणि विविध बँकेचे प्रतिनिधी यांच्यात ही बैठक पार पडली. या वेळी आतापर्यंत 10 हजार रुपयांचे कर्ज 6711 तसेच 20 हजार रुपयांचे कर्ज 1544 आणि 50 हजार रुपयांचे कर्ज 141 पथविक्रेत्यांनी घेतल्याचे समोर आले. मात्र अजूनही 11,053 फेरीवाल्यांनी बँकांकडे ऑनलाइन कर्ज मिळण्यासाठी अर्ज केले असून त्या अर्जदारांना लवकर कर्जपुरवठा करा अशी सूचना सोमवारी बैठकीत पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केली. या बैठकीमध्ये विविध बँकांचे प्रतिनिधी, पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात 7800 पथविक्रेत्यांची नोंदणी झाली आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल राहावे यासाठी ही योजना लाभदायी आहे. स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचे पहिले कर्ज वेळेत किंवा वेळेच्या आधी फेडल्यास याच योजनेतून पथविक्रेत्यांना दुसरे कर्ज 20 हजार रुपयांचे दिले जाते. त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज उपलब्ध होते. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध बँकांनी महापालिकेला पंतप्रधान स्वनिधी योजना राबविण्यास उत्तम सहकार्य केल्याबद्दल बैठकीमध्ये पालिकेचे उपायुक्त डॉ. विधाते यांनी बँकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai